सांताक्रूझच्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर यशवंतनगर झोपडपट्टी आहे. याच ठिकाणी १० बाय १२च्या झोपडीत रिशांक देवाडिगा (२२) राहतो.. म्हणजे राहायचा.. त्याचा पत्ता आता बदललाय आणि त्याचबरोबर नशीबही! केवळ कबड्डीवरील निस्सीम प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. प्रो-कबड्डी लीगमधील ‘यू मुंबा’ या संघाने लिलावात रिशांकला सव्वा पाच लाख रुपयांचे घसघशीत मानधन दिले आहे.
रिशांकच्या घरात गरिबी पाचवीला पुजलेली. ज्या परिसरात राहतो तो परिसरही घाणीने बरबटलेला. पावसाळ्यात झोपडी जलमय होणे ठरलेलेच. प्रतिकूल परिस्थिती असूनही दुर्दम्य आशावाद असेल तर जग जिंकता येते, याचीच प्रचिती रिशांकच्या आतापर्यंतच्या वाटचालीकडे पाहिले की येते. तीन वर्षांचा असतानाच रिशांकच्या वडिलांचे निधन झाले. आई पार्वतीबाईंनी मग ब्युटी पार्लरमध्ये नोकरी स्वीकारत रिशांक व त्याच्या बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. कबड्डीची आवड रिशांकला लहानपणापासूनच होती. वाकोला परिसरातील मुलांसोबत तो सागर क्रीडा मंडळाकडून कबड्डी खेळू लागला. मात्र, हाच खेळ पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला वेगळे वळण देईल याची सूतराम कल्पना रिशांकच्या आईला नव्हती.
रिशांक आपल्या वाईट दिवसांविषयी म्हणाला, ‘घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे बारावी पास झाल्यावर मी लीला हॉटेलमध्ये वेटरची नोकरी पत्करली. सुटीच्या दिवशी कबड्डी खेळायचं, असा शिरस्ता मात्र मी आवर्जून जपला. उपनगरातील एका सामन्याप्रसंगी माझा खेळ प्रताप शेट्टी यांच्या नजरेत भरला. मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझा कबड्डीचा प्रवास सुरू झाला. मग ठाण्यातील एका स्पध्रेत प्रशिक्षक राजेश पाडावे यांनी मला देना बँकेकडून शिष्यवृत्ती स्वरूपात कबड्डी खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. पाच हजार रुपये मानधन आणि खेळायचेसुद्धा यामुळे हा प्रस्ताव मी त्वरित स्वीकारला. मग फक्त कबड्डी खेळून आयुष्याचे चीज होते का हे पाहू, असा निर्धार केला.’
गेली तीन वष्रे रिशांक राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत खेळतो आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत आहे. सध्या भारतीय संघाच्या विशेष प्रशिक्षण शिबिरातसुद्धा त्याला स्थान देण्यात आले आहे. याचप्रमाणे भारत पेट्रोलियममध्येसुद्धा त्याला नोकरी मिळाली आहे. आता ‘प्रो-कबड्डी’मुळे कबड्डीवरचा त्याचा विश्वास सार्थ ठरला आहे. झोपडपट्टीतून एका सुस्थित परिसरात रिशांकने आता भाडेतत्त्वावर घर घेतले आहे. लवकरच कुटुंबीयांना स्वत:च्या मालकीच्या घरात घेऊन जाण्याचा विश्वास त्याच्या बोलण्यातून डोकावतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा