दुसऱ्या सत्रातील दिमाखदार खेळाच्या बळावर दबंग दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या बलाढय़ यु मुंबाला ३६-२७ असे पराभूत केले. बंगळुरू बुल्सवर शानदार विजय मिळवणाऱ्या दिल्लीने आणखी एका विजयाची नोंद केली, तर यु मुंबाला पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात मात्र सलग दुसरा पराभव वाटय़ाला आला. याचप्रमाणे राकेश कुमारच्या चतुरस्र खेळाच्या बळावर पाटणा पायरेट्सने पुणेरी पलटणला ३७-३१ अशी धूळ चारली.
पहिल्या लढतीत पूर्वार्धात दिल्लीकडे दोन गुणांची आघाडी होती. पण उत्तरार्धात यु मुंबाचा निभाव लागला नाही. दिल्लीकडून सुरजित नरवालने चढायांचे ११ आणि काशिलिंग आडकेने ८ गुण मिळवत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मुंबईकडून कर्णधार अनुप कुमारने एकाकी झुंज देत चढायांचे १० गुण मिळवले.
पुण्याला जितेश जोशी आणि मंगेश भगत यांच्या खेळाच्या बळावर पाटण्याला हरवता आले नाही. राकेश कुमारने १३ चढायांमध्ये १० गुणांची कमाई करीत पाटण्याच्या विजयाची पायाभरणी केली. संदीप नरवालने चढायांचे ९ गुण मिळवत त्याला छान साथ दिली.

Story img Loader