यूपी योद्धाने सलग आठ सामन्यांत अपराजित (सात विजय, एक बरोबरी) राहण्याची किमया साधताना प्रो कबड्डी लीगच्या ‘अंतिम पात्रता सामना-२’पर्यंत (क्वालिफायर-२) मजल मारली आहे. गुरुवारी मुंबईच्या एनएससीआय बंदिस्त स्टेडियमवर यूपीची विजयी घोडदौड रोखण्याचे आव्हान गतउपविजेत्या गुजरात फॉच्र्युनजायंट्सपुढे असेल.

यूपी योद्धाचे बाद फेरीतील स्थान साखळीमधील अखेरच्या सामन्यात निश्चित झाले. त्यानंतर या संघाने आक्रमकतेचे रूप धारण करून ‘बाद फेरीतील सामना-१’मध्ये (एलिमिनेटर-१) यूमुंबासारख्या बलाढय़ संघाचे आव्हान संपुष्टात आणले, तर ‘बाद फेरीतील सामना-३’ मध्ये दबंग दिल्लीला धूळ चारली. त्यामुळेच गुजरातसमोर त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

साखळीत अ-गटातून अव्वल ठरणाऱ्या गुजरात फॉच्र्युनजायंट्सने बाद फेरीत प्रवेश करण्यापूर्वी सलग सहा सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केला होता. मात्र ‘अंतिम पात्रता सामना-१’मध्ये (क्वालिफायर-१) बेंगळूरु बुल्सने त्यांचा १२ गुणांनी पराभव करून थेट अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली.

यूपी योद्धाचा उजवा कोपरारक्षक नितेश कुमार सध्या पकडपटूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. यूपीच्या आतापर्यंतच्या विजयांमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गुजरातच्या चढाईबहाद्दरांना त्याचा प्रमुख धोका असेल. त्याला संरक्षणात जिवा कुमार व नरेंदरची साथ असेल. याशिवाय प्रशांत कुमार राय, श्रीकांत जाधव आणि कर्णधार रिशांक देवाडिगा यांच्यावर यूपीच्या आक्रमणाची धुरा असेल.

गुजरातच्या आक्रमणाची मदार सचिन तन्वरवर असेल. तसेच के. प्रपंजन आणि रोहित गुलिया हे त्याचे चढायांचे साथीदार असतील. त्यांच्या बचावाची जबाबदारी ऋतुराज कोरवी, परवेश भन्सवाल व कर्णधार सुनील कुमार यांच्यावर असेल.

Story img Loader