कोलकाता : गुजरात फॉच्र्युनजायंट्स संघाने अटीतटीच्या लढतीत पाटणा पायरेट्सवर ३७-२९ असा विजय साकारला. गुजरातच्या या विजयामुळे प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात बाद फेरी गाठण्याच्या पाटणा पायरेट्सच्या आशा धूसर झाल्या आहेत.
ब गटातून बंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स यांनी बाद फेरीत आगेकूच केली आहे. तिसऱ्या स्थानासाठी पाटणा आणि यूपी योद्धा यांच्यात चुरस होती. पण या पराभवामुळे पाटणा तिसऱ्या स्थानावर असला तरी यूपी योद्धाने अखेरच्या सामन्यात विजय मिळवला तर ते बाद फेरी गाठतील आणि पाटणा पायरेट्सचे आव्हान संपुष्टात येईल.
गुजरातच्या भक्कम बचावामुळे पाटणा पायरेट्सच्या चढाईपटूंना गुण मिळवताना कसरत करावी लागत होती. कर्णधार सुनील कुमारने पकडींमध्ये मिळवलेले पाच गुण गुजरातच्या विजयात निर्णायक ठरले. गुजरातकडून चढाईत रोहित गुलियाने ९ गुणांची कमाई केली. प्रदीप नरवालची (१० गुण) झुंज पाटणासाठी अपयशी ठरली.
दुसऱ्या सामन्यात, बंगाल वॉरियर्सने बेंगळुरू बुल्सचा ३७-३१ असा पराभव केला. बंगालकडून मणिंदर सिंगने चढायांचे १६ गुण मिळवले.