प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात यू मुम्बा संघाने प्रमुख खेळाडूंना डावलून नवीन खेळाडूंना संधी दिली. या निर्णयामुळे काहीकाळ चाहत्यांमध्ये चांगलीच निराशा पसरली होती. मात्र स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर यू मुम्बाने सर्वांना आश्चर्यचकीत करुन सो़डलं आहे. सध्या अ गटात यू मुम्बाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईने अल्पावधीतच मुम्बाच्या संघाची चढाईची जबाबदारी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली आहे. मंगळवारी घरच्या मैदानावर उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यातही सिद्धार्थने आपलं मोलाचं योगदान दिलं.

घरच्या मैदानावर खेळत असताना सिद्धार्थ देसाईला प्रेक्षकांचा प्रचंड पाठींबा मिळतोय. सामना पहायला येणारे प्रेक्षक, लहान मुलं ही सिद्धार्थच्या पोस्टर्ससोबत सेल्फी घेताना दिसतात. प्रत्येक चढाईदरम्यान मैदानात सिद्धार्थच्या नावाचा गजर होतो. अल्पावधीत मिळालेल्या या यशाचं दडपण येतं का? असं विचारलं असताना सिद्धार्थ म्हणाला, “मी मैदानात उतरलो की फक्त खेळाकडे लक्ष केंद्रीत करतो. लोकं मला प्रचंड पाठींबा देतायच, त्यांच्या माझ्याकडून अनेक अपेक्षा आहेत. मात्र मैदानात मी या गोष्टींचा विचार करत नाही. माझ्यासाठी खेळ हा अधिक महत्वाचा असतो. चांगला खेळत राहिला तर प्रेक्षकांचं प्रेम मला सतत मिळतच राहणार आहे.”

सहाव्या हंगामाचा विचार केला असता, सिद्धार्थ देसाईने सर्व बाबतींमध्ये आपली छाप पाडली आहे. सर्वाधिक चढाईतले गुण आणि एकूण सर्वाधिक गुण या निकषांमध्ये सिद्धार्थ देसाईने पाटण्याच्या प्रदीप नरवालला मागे टाकलं आहे. याचसोबत यशस्वी चढाया आणि सुपर 10 प्रकारातही सिद्धार्थने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

 

सध्या घरच्या मैदानात यू मुम्बाला दोन सामने खेळायचे आहेत. यू मुम्बाचा आजचा सामना बंगळुरु बुल्सविरुद्ध तर उद्याचा सामना तामिळ थलायवाजविरुद्ध रंगणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास यू मुम्बाचा संघ अ गटात आपलं अव्वल स्थान अधिक बळकट करेल.

Story img Loader