प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात हरयाणा स्टिलर्सच्या खराब कामगिरीची मालिका सुरुच आहे. इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत बंगळुरु बुल्सने हरयाणा स्टिलर्सवर 42-34 च्या फरकाने मात केली. बचावफळीतल्या खेळाडूंची खराब कामगिरी आजच्या सामन्यात हरयाणा स्टिलर्सचा चांगलीच भोवली. बंगळुरु बुल्सकडून चढाईपटू पवनकुमार शेरावत आणि कर्णधार रोहित कुमारने चांगली कामगिरी केली.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : बंगळुरु बुल्सचे सामने पुण्याच्या मैदानात हलवले
पहिल्या सत्रात हरयाणाच्या खेळाडूंनी आश्वासक खेळ केला होता. चढाईपटू विकास कंडोला आणि कर्णधार मोनू गोयत यांनी बंगळुरुच्या बचावफळीचा खिंडार पाडत सामन्यात आघाडी घेतली होती. पहिल्या सत्राअखेरीस हरयाणा सामन्यात 15-13 अशा दोन गुणांच्या फरकाने आघाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात बंगळुरु बुल्सने सामन्याचं चित्रच पालटलं. पवन आणि रोहित यांनी धडाकेबाज कामगिरी करत हरयाणाला सामन्यात बॅकफूटवर ढकललं. या धक्क्यातून हरयाणाचा संघ सावरुच शकला नाही, अखेर बंगळुरु बु्ल्सने सामन्यात बाजी मारली.