पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आपल्या घरच्या मैदानावरचे सामने खेळणाऱ्या बंगळुरु बुल्स संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अटीतटीच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने बंगळुरु बुल्सवर 33-31 अशी मात केली.
बंगळुरुच्या बचावपटूंनी आजच्या सामन्यात केलेली निराशा हे त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरली. पवन शेरावत, रोहित कुमार आणि काशिलींग अडके यांनी चढाईत आपली कामगिरी चोख बजावली. बंगालने केलेल्या आक्रमणाला बंगळुरुच्या या त्रिकुटाने चांगलं उत्तर दिलं. मात्र आशिष सांगवानचा अपवाद वगळता एकही बचावपटू आजच्या सामन्यात आपली छाप पाडू शकला नाही. ज्याचा फटका बंगळुरुला पहिल्याच सामन्यात बसला.
दुसरीकडे बंगाल वॉरियर्स संघाने अष्टपैलू खेळ केला. मणिंदर सिंह, महेश गौड यांनी बंगळुरुच्या बचावफळीला खिंडार पाडत पहिल्या सत्रापासून सामन्यात आपली आघाडी कायम ठेवली. मणिंदर सिंहने सामन्यात 14 गुणांची कमाई केली. त्याला बचावफळीत रण सिंह व अन्य खेळाडूंनी चांगली साथ दिली. अखेरच्या काही सेकंदांमध्ये बंगळुरुने सामन्यात रंगत निर्माण केली होती, मात्र बंगालला बरोबरीत रोखणं त्यांना जमलं नाही.