बचावफळीच्या निराशाजनक कामगिरीमुळे जयपूर पिंक पँथर्स संघाला आज पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. दबंग दिल्लीने जयपूरची झुंज मोडून काढत सामन्यात 40-29 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. दिल्लीच्या सर्व खेळाडूंनी आज अष्टपैलू खेळ केला, जयपूरकडून चढाईमध्ये दिपक निवास हुडा आणि अनुप कुमार यांनी चांगली झुंज दिली. मात्र जयपूरच्या बचावपटूंना आपली छाप पाडता न आल्यामुळे दिल्लीने सामन्यात बाजी मारली.

दिल्लीच्या नवीन कुमार, मिराज शेख आणि चंद्रन रणजीत या त्रिकुटाने जयपूरच्या बचावाची अक्षरशः खिल्ली उडवली. काही मोजके क्षण वगळता जयपूरचा एकही बचावपटू या त्रिकुटाला सामन्यात रोखू शकला नाही. दोन्ही कोपऱ्यांमधून दिल्लीच्या चढाईपटूंनी सुरेख बोनस पॉईंटची कमाई केली. नवीन कुमारने सामन्यात 10 गुण मिळवले तर मिराज आणि चंद्रन यांनी अनुक्रमे 9 व 8 गुणांची कमाई केली. दिल्लीच्या बचावपटूंनीही आज आपली छाप पाडली. कर्णधार जोगिंदर नरवालने बचावात 5 गुण मिळवत जयपूरचं सामन्यातलं उरलं-सुरलं आव्हानही मोडून काढलं.

दुसरीकडे जयपूरकडून चढाईमध्ये दिपक निवास हुडा आणि अनुप कुमार यांनी चांगली झुंद देण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य सर्व खेळाडूंनी आजच्या सामन्यात निराशा केली. दिपकने चढाईत 15 तर अनुपने 6 गुण मिळवले. मात्र मोहीत छिल्लर, बाजीराव होडगे यांसारख्या बचावपटूंनाही आज निराशाचे सामना करावा लागला. या पराभवानंतर जयपूरचा संघ अ गटात तळातल्या स्थानावर फेकला गेला आहे.

Story img Loader