प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात घरच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये हरयाणा स्टिलर्स संघाने आपल्या पराभवाची मालिका खंडीत केली आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात हरयाणाने दबंग दिल्लीवर ३४-३१ ने मात केली. हरयाणाकडून विकास कंडोला आणि मोनू गोयतने चढाईत आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. विकासने ९ तर मोनू गोयतने ७ गुणांची कमाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या हरयाणाच्या बचावफळीनेही या सामन्यात चोख कामगिरी बजावली. दबंग दिल्लीच्या संघाने संपूर्ण सामन्यात हरयाणा स्टिलर्स संघाला चांगली टक्कर दिली. मात्र मोक्याच्या क्षणी बचावपटूंनी केलेल्या चुकांमुळे हरयाणाने सामन्यात बाजी मारली. दिल्लीकडून चढाईमध्ये चंद्रन रणजित आणि पवन कादियान यांनी अनुक्रमे ८ व ७ गुणांची कमाई केली. आज हरयाणा शहरातले सामने संपले असून उद्या पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात कबड्डीचे सामने रंगणार आहेत.

Story img Loader