प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात तामिळ थलायवाज प्रमाणे हरयाणा स्टिलर्स संघाचीही घरच्या मैदानावर खराब कामगिरीची परंपरा सुरुच राहिली आहे. कालच्या सामन्यात यू मुम्बाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आज पुणेरी पलटण संघाने हरयाणावर मात केली आहे. 45-27 च्या फरकाने पुण्याच्या संघाने हा सामना जिंकला.

यू मुम्बाविरुद्ध सामन्याप्रमाणे हरयाणा संघाची बचावफळी या सामन्यातही फारशी चमक दाखवू शकली नाही. विकास कंडोला, मोनू गोयत यांनी एकाकी झुंज देत पुण्याला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे हरयाणाचे बचावपटू पुण्याला एक-एक गुण बहाल करत राहिले. यामुळे हरयाणाचा संघ सामन्यात परतूच शकला नाही. हरयाणाकडून विकास कंडोलाने 11 गुणांची कमाई केली. कर्णधार मोनू गोयतने 8 गुण मिळवले, पण यादरम्यान पुण्याच्या बचावपटूंनी 7 वेळा त्याची पकड केली.

पुणेरी पलटण संघाने मात्र अष्टपैलू खेळ केला. नितीन तोमर, राजेश मोंडल आणि गुरुनाथ मोरे या त्रिकुटाने चढाईत गुणांची कमाई करणं सुरु ठेवलं. या तिन्ही खेळाडूंना बचावामध्ये गिरीश एर्नाक, संदीप नरवाल, अक्षय जाधव यांनी चांगली साथ दिली. नितीन तोमरने पुण्याकडून चढाईमध्ये सर्वाधीक 10 गुण कमावले. दरम्यान आजच्या सामन्यात पंचांनी पुण्याच्या संदीप नरवालला ‘येलो कार्ड’ दाखवत 2 मिनीटं मैदानाच्या बाहेर काढलं. या हंगामातलं हे पहिलं ‘येलो कार्ड’ ठरलं.

Story img Loader