प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात यू मुम्बाला गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाकडून पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या लढतीत गुजरातने मुंबईवर ३८-३६ अशा दोन गुणांच्या फरकाने बाजी मारली. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघ जोशाने खेळले, त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत विजयाचं पारडं दोलायमान होत होतं. मात्र मोक्याच्या क्षणी यू मुम्बाच्या चढाईपटूंनी केलेली चूक संघाला चांगलीच महागात पडली. दुसऱ्या सत्रात ४-५ गुणांनी आघाडीवर असणारा यू मुम्बाचा संघ अचानक ५ गुणांनी पिछाडीवर पडला.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर मुंबई गुजरातकडून पराभूत
यू मुम्बाच्या बचावफळीने गुजरातविरुद्धच्या फॉर्मात निराशाजनक खेळ केला. सुरिंदर सिंहने कव्हरच्या जागेवरुन खेळताना अनेक गुणांची खैरात केली. बचावफळीच्या याच क्षुल्लक चुकांमुळे संघाला सामना गमवावा लागला का असा प्रश्न विचारला असता, फजल अत्राचलीने एखाद्या कुशल कर्णधाराप्रमाणे आपल्या संघाचा बचाव केला. “आमचा संघ सामना हरलाय यासाठी मी जबाबदार आहे. अखेरच्या क्षणात मी काही पकडी करायला नको होत्या. मात्र स्पर्धेत एखाद्या सामन्यात अशा गोष्टी होत असतात. काहीवेळेपर्यंत सामन्यावर आमचं नियंत्रण होतं, मात्र गुजरातने ती संधी हिरावून घेतली, याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं.” फजल पत्रकारांशी बोलत होता.
“सुरिंदर हा तरुण खेळाडू आहे, त्यामुळे जोशात त्याच्याकडून काहीवेळा चुका होत असतात. मात्र प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. आज त्याच्याकडून काही चुका झाल्या असल्या तरीही पुढच्या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल याबद्दल मला आत्मविश्वास आहे. प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू त्याला लक्ष्य करतायत, मात्र संपूर्ण सामन्यात १-२ वेळाच त्यांना यश मिळतं.” यू मुम्बाच्या प्रशिक्षकांनीही सुरिंदरला आपला पाठींबा दर्शवला. प्रो-कबड्डीच्या इतिहासात यू मुम्बाचा संघ एकदाही गुजरातला हरवु शकलेला नाहीये. शनिवारी झालेल्या सामन्यानंतर गुजरातने आपला हा विक्रम कायम राखला आहे.