प्रदीर्घ कालावधीनंतर जयपूर पिंक पँथर्सने आज विजयाची चव चाखली. हरयाणा स्टिलर्स संघाविरुद्ध 38-32 असा निसटता विजय मिळवत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. दिपक निवास हुडाचा चढाईतला आक्रमक खेळ व त्याला इतर खेळाडूंनी दिलेली भक्कम साथ या जोरावर जयपूरने आजच्या सामन्यात विजय संपादन केला. हरयाणानेही आजच्या सामन्यात चांगली झुंज दिली, मात्र मोक्याच्या क्षणी जयपूरला रोखण्यात ते अयशस्वी ठरले.
दिपक निवास हुडाने जयपूरकडून चढाईत 12 गुणांची कमाई केली. त्याच्या याच खेळीमुळे जयपूरने अखेरपर्यंत आपली नाममात्र आघाडी कायम ठेवली. दिपकला सिल्वामणी आणि नितीन रावलने चांगली साथ दिली. बचावफळीतही मोहित छिल्लर, सुनील सिद्धगवळी यांनी काही चांगले गुण कमावले. हरयाणाकडून विकास कंडोलाने जयपूरला चांगली झुंज दिली. मात्र मोनू गोयत मोक्याच्या क्षणी जयपूरची बचावफळी भेदू शकला नाही. संपूर्ण सामन्यात मोनू गोयतला फक्त 4 गुणांची कमाई करता आली. विकास कंडोलाने चढाईत 10 गुण कमावले. मयुर शिवतरकर, सचिन शिंगाडे, कुलदीप सिंह यांनी आजच्या सामन्यात चांगला खेळ केला, मात्र आपल्या संघाचा पराभव ते रोखू शकले नाहीत.