प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात हरयाणा स्टिलर्स संघाने एका सामन्यानंतर नेतृत्वबदल केला आहे. पुणेरी पलटणविरुद्धच्या सामन्यात कर्णधार सुरिंदर नाडाला दुखापत झाल्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी हरयाणा संघाच्या व्यवस्थापनाने मोनू गोयतकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. 12 तारखेपासून हरयाणाचा संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार आहे.
“मोनू हा यंदाच्या हंगामातला आमचा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे सुरिंदर नाडाच्या अनुपस्थितीत तोच कर्णधारपदाचा दावेदार होता. दोन्ही खेळाडूंची खेळण्याची शैली ही वेगळी आहे, मोनू सुरिंदरला पर्याय ठरु शकत नाही. मात्र मैदानात तो चांगलं नेतृत्व करेल असा मला आत्मविश्वास आहे.” हरयाणा स्टिलर्स संघाचे प्रशिक्षक रामबिरसिंह खोकर यांनी आपलं मत मांडलं.
सुरिंदरला झालेली दुखापत पाहता, हरयाणा संघाने 23 वर्षीय नवीन बजाजला संघात जागा दिली आहे. पहिल्याच सामन्यात पुणेरी पलटण संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेल्या हरयाणाला घरच्या मैदानावर पहिला सामना गुजरातचा करायचा आहे. त्यामुळे मोनू गोयतच्या नेतृत्वाखाली हरयाणाचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.