प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळणाऱ्या पाटणा पायरेट्सने आश्वासक सुरुवात केली आहे. जयपूर पिंक पँथर्स संघावर ४१-३० ने मात केली. पाटणा पायरेट्सकडून प्रदीप नरवालने पुन्हा एकदा धडाकेबाज खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला.
कर्णधार प्रदीप नरवालला आज युवा चढाईपटू मनजीतने चांगली साथ दिली. प्रदीपने सामन्यात ११ तर मनजीतने १० गुणांची कमाई केली. जयपूरच्या बचावफळीला खिंडार पाडत दोन्ही खेळाडूंनी पाटण्यासाठी काही चांगले गुण कमावले. महत्वाची गोष्ट म्हणजे पाटण्याच्या बचावपटूंनीही आज आपल्या चढाईपटूंना चांगली साथ दिली. विकास काळेने बचावफळीत ५ गुण मिळवले.
जयपूर पिंक पँथर्सकडून कर्णधार अनुप कुमार, दीपक निवास हुडाने चढाईत आश्वासक खेळ केला. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी ८-८ गुणांची कमाई केली. मात्र जयपूरची बचावफळी आजच्या सामन्यात पुरती निष्रभ ठरली. पाटण्याच्या एकाही महत्वाच्या खेळाडूवर नियंत्रण ठेवणं जयपूरच्या बचावपटूंना जमलं नाही. त्यामुळे या ढिसाळ बचावाचा फायदा घेत पाटण्याने सामन्यात बाजी मारली.