प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात गतविजेत्या पाटणा पायरेट्सच्या गाडीने आता जोर पकडला आहे. उत्तर प्रदेश योद्धाजवर 43-37 ने मात करत पाटणा पायरेट्सने आपल्या खात्यात आणखी एका विजयाची नोंद केली आहे. पाटण्याकडून प्रदीप नरवालचं फॉर्मात येणं व त्याला अन्य खेळाडूंनी दिलेली साथ या गोष्टींनी विजयात महत्वाचा वाटा उचलला. उत्तर प्रदेशच्या चढाईपटूंनीही आजच्या सामन्यात आश्वासक खेळ केला, मात्र त्यांच्या बचावपटूंनी आज पुरती निराशा केली.
सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघ हे सावध पवित्रा घेऊन बरोबरीत खेळत होते. यानंतर कर्णधार प्रदीप नरवालने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत उत्तर प्रदेशच्या संघाला सर्वबाद केलं. यानंतर उत्तर प्रदेशच्या चढाईपटूंनीही आक्रमक चढाया करत सामन्यात पुनरागमन केलं, मात्र बचावपटूंनी केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे पाटण्याचा संघ पहिल्या सत्रात दोनदा सर्वबाद होता होता राहिला. मध्यांतरापूर्वी उत्तर प्रदेशच्या श्रीकांत जाधवने एका चढाईत 3 गुणांची कमाई करत पाटण्याची आघाडी 19-17 अशी कमी केली.
उत्तर प्रदेशच्या संघाने आजच्या सामन्यात केवळ दोन चढाईपटूंना पहिल्या 7 जणांच्या संघात स्थान दिलं. त्यांची हीच रणनिती पाटण्याविरुद्धच्या सामन्यात पुरती उलटली. श्रीकांत जाधव आणि कर्णधार रिशांक देवाडीगाने चढाईत अनुक्रमे 17 व 11 गुणांची कमाई केली. मात्र उत्तर प्रदेशचा एकही बचावपटू दोघांची साथ देऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रात उत्तर प्रदेशने प्रशांत कुमार रायला संघात जागा दिलीही, मात्र तोपर्यंत पाटण्याने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली होती. पाटण्याकडून प्रदीप आणि दिपक नरवालने चांगल्या गुणांची कमाई केली.