गेल्या काही सामन्यांमध्ये प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या पुणेरी पलटण संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र दबंग दिल्लीविरुद्ध सामन्यात निसटत्या विजयाची नोंद करत पुणेरी पलटण संघाने आपली गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर आणली आहे. अष्टपैलू खेळाच्या जोरावर पुण्याने दिल्लीची झुंज ३१-२७ अशी मोडून काढली.

अवश्य वाचा – सहाव्या हंगामात प्रो-कबड्डीला अल्प प्रतिसाद, प्रेक्षकसंख्या घटल्याची माहिती

आजच्या सामन्यात पुण्याचा कर्णधार गिरीश एर्नाकने पुनरागमन केलं. कर्णधाराच्या पुनरागमनाचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही चांगलाच दिसून आला. गुरुनाथ मोरे आणि दीपक दाहिया यांनी चढाईची धुरा सांभाळत संघासाठी महत्वाच्या गुणांची कमाई केली. मराठमोळ्या गुरुनाथने चढाईत ५ गुण कमावले. दबंग दिल्लीच्या बचावफळीतले कच्चे दुवे हेरत पुण्याच्या दोन्ही चढाईपटूंनी आक्रमक खेळ केला. गुरुनाथ आणि दिपक यांना बचावफळीकडूनही तितकीच मोलाची साथ मिळाली. पुनरागमन करणाऱ्या गिरीश एर्नाकने चढाईत २ गुण मिळवले.

दुसरीकडे दबंग दिल्लीच्या संघाला अष्टपैलू खेळ करता आला नाही. चढाईत नवीन कुमार आणि बचावफळीत जोगिंदर नरवालने पुण्याच्या खेळाडूंना चांगली झुंज दिली. मात्र दिल्लीच्या इतर खेळाडूंनी आज सामन्यात पुरती निराशा केली. बचावपटू रविंदर पेहल, विशाल माने आज आपली छाप पाडू शकले नाही. चंद्रन रणजीत, मिराज शेख यांनी आपल्या परीने संघाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत पुण्याने सामन्यात बाजी मारली होती.

Story img Loader