प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात घरच्या मैदानावर खेळताना पुणेरी पलटण संघाने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत पुण्याने बंगळुरु बुल्सची झुंज 27-25 ने मोडून काढत सामन्यात विजय संपादन केला. मोक्याच्या क्षणी पुण्याच्या बचावपटूंनी केलेल्या पकडीमुळे पुण्याने सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : दिल्ली ठरली दबंग, बंगाल वॉरियर्स पराभूत

संपूर्ण सामन्यात दोन्ही संघ सावध पवित्रा घेऊन खेळल्यामुळे जास्त गुणसंख्या होऊ शकली नाही. मात्र पुण्याकडून चढाईपटू व बचाफळीतल्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ केला. मोनू आणि नितीन तोमरने चढाईमध्ये पुण्यासाठी काही महत्वाच्या गुणांची कमाई केली. त्यांना पुण्याच्या अक्षय जाधव, शुभम शिंदे या बचावपटूंनी चांगली साथ दिली. यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत पुण्याने सामन्यात एका गुणाची नाममात्र आघाडी राखून ठेवली होती.

बंगळुरु बुल्सच्या बचावपटूंनी सामन्यात केलेल्या क्षुल्लक चुका त्यांना चांगल्याच महागात पडल्या. आशिष सांगवान आणि संदीप यांनी नितीन तोमर सारख्या चढाईपटूला मध्य रेषेवर पकडण्याची चूक करत पुण्याला गुण बहाल केले. चढाईत काशिलींग अडकेने 8 तर पवन शेरावतने 6 गुणांची कमाई केली. या दोघांना कर्णधार रोहित कुमारनेही चांगली साथ दिली. मात्र शेवटच्या चढाईत काशिलींग अडके गुण मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे पुण्याने सामन्यात बाजी मारली.