झप्रो-कबड्डीच्या इतिहासात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला पराभूत करण्याचं यू मुम्बाचं स्वप्न आजही धुळीला मिळालं. पहिल्या सत्रात घेतलेली आघाडी, यू मुम्बाच्या खेळाडूंनी हाराकिरी करत सामना गुजरातला बहाल केला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने अटीतटीच्या सामन्यात 39-35 ने बाजी मारली. गुजरातचा यू मुम्बावरचा हा पाचवा विजय ठरला आहे.
पहिल्या सत्रात यू मुम्बाच्या खेळाडूंनी आक्रमक सुरुवात करत गुजरातला चांगलाच धक्का दिला. चढाईमध्ये सिद्धार्थ देसाई आणि रोहित बालियान यांनी आक्रमक खेळ करत मूम्बाला आघाडी मिळवून दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे यू मुम्बाच्या बचावपटूंनी त्यांना चांगली साथ दिली. मात्र पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात गुजरातने सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. के. प्रपंजनने चढाईत काही गुणांची कमाई करत गुजरातचं आव्हान जिवंत ठेवलं. मात्र यू मुम्बाने पहिल्या सत्राअखेरीस 21-16 अशी आघाडी कायम ठेवली होती.
दुसऱ्या सत्रात सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलं. प्रपंजन आणि सचिन तवंर या खेळाडूंनी यू मुम्बाच्या बचावफळीला चुका करणं भाग पाडलं. मोक्याच्या क्षणी महत्वाच्या खेळाडूंना बाहेर करत गुजरातने हळूहळू सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. याचसोबत दुसऱ्या सत्रात सिद्धार्थ देसाईला बाद करण्यात गुजरातच्या खेळाडूंना यश मिळालं. परवेश भैंसवालने सामन्यात काही चांगल्या पकडी केल्या. दुसऱ्या सत्रात यू मुम्बाला दोनदा सर्वबाद करत गुजरातने सामन्यात आघाडी घेत 39-35 च्या फरकाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.