घरच्या मैदानावर तामिळ थलायवाज संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगळुरु बुल्स संघाने तामिळ थलायवाजचा ४८-३७ ने धुव्वा उडवला. बंगळुरुकडून पवन कुमार शेरावत आणि काशिलींग अडके यांनी चढाईत भरघोस गुणांची कमाई करत तामिळ थलायवाजला सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी दिलीच नाही.

सामन्यात पहिल्या सत्रापासून बंगळुरु बुल्सच्या चढाईपटूंनी तामिळ थलायवाजवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. पवन शेरावतने तामिळच्या बचावफळीला खिंडार पाडलं. पहिल्या सत्रात एका चढाईत ५ खेळाडूंना बाद करत पवनने तामिळ संघाला धक्का दिला. पवनच्या या आक्रमक खेळीमुळे बंगळुरुच्या इतर चढाईपटूंना पहिल्या सत्रात फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मात्र दुसऱ्या सत्रात पवनला दुखापत झाल्यामुळे बाहेर जावं लागलं, यानंतर काशिलींग अडकेने चढाईची धुरा सांभाळात पवनची उणीव संघाला भासू दिली नाही.

दुसरीकडे तामिळ थलायवाज संघाच्या बचावपटूंनी आज निराशाजनक खेळ केला. मनजीत छिल्लर, अमित हुडा यासारख्या अनुभवी खेळाडूंना आज आपली छाप पाडता आली नाही. चढाईत कर्णधार अजय ठाकूर आणि अतुल एम. एस ने चांगले गुण मिळवले, मात्र त्यांना बचावपटूंची साथ न लाभल्यामुळे तामिळ थलायवाजला हार पत्करावी लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.