प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या तामिळ थलायवाजला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. बंगाल वॉरियर्सने तामिळ थलायवाजवर 36-27 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. बंगालच्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळापुढे तामिळ थलायवाजचा संघ सामन्यात पुनरागमन करु शकला नाही.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : पाटण्याच्या विजयात प्रदीप नरवाल चमकला, उत्तर प्रदेशवर मात
आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या तामिळ थलायवाजला बंगालविरुद्ध विजयाची नितांत गरज होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात बंगाल वॉरियर्सने तामिळ थलायवाजला वरचढ होण्याची संधी दिली नाही. पहिल्या सत्रात काही मिनीटांपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत खेळत होते, एका क्षणानंतर तामिळ थलायवाजने आक्रमक चढाया करत बंगाल वॉरियर्सवर ऑलआऊटची वेळ आणली. मात्र दोन्ही वेळा बंगाल वॉरियर्सच्या चढाईपटूंनी संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचवत संघाला मध्यांतराला 18-15 अशी आघाडी मिळवून दिली. बंगालकडून मणिंदर सिंह, जँग कून ली, महेश गौड यांनी चढाईत चांगल्या गुणांची कमाई केली.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : हरयाणा स्टिलर्स संघात नेतृत्वबदल, मोनू गोयत नवीन कर्णधार
दुसऱ्या सत्रात तामिळ थलायवाजच्या खेळाडूंनी पुरती निराशा केली. बंगालच्या बचावपटूंनी तामिळ थलायवाजच्या महत्वाच्या चढाईपटूंना मैदानाच्या बाहेर ठेवत सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. तामिळ थलायवाजकडून अजय ठाकूरने एकट्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र बंगालच्या बचावापुढे त्याचीही डाळ शिजू शकली नाही. बंगालकडून मणिंदर सिंहने बचावात सर्वाधिक 9 गुणांची कमाई केली. तामिळ थलायवाजकडून जसवीर सिंह, अजय ठाकूर, मनजीतत छिल्लर यांनी अष्टपैलू खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे तामिळला पराभव स्विकारावा लागला.