प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्सने गतविजेत्या पाटणा पायरेट्सवर मात केली. राहुल चौधरी, निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू यांचा चढाईत आक्रमक खेळ आणि त्यांना बचावपटूंनी दिलेली उत्तम साथ या जोरावर तेलगू टायटन्सने पाटणा पायरेट्सचं आव्हान 35-31 असं परतवून लावलं.
तेलगू टायटन्सच्या चढाईपटूंनी सामन्यात आपल्या चढायांमध्ये सातत्य राखत पाटणा पायरेट्सच्या बचावफळीला खिंडार पाडलं. पाटण्याचा एकही बचावपटू तेलगूच्या चढाईपटूंवर नियंत्रण ठेऊ शकला नाही. जयदीप, विकास जागलान, विकास काळे हे तिन्ही खेळाडू सामन्यात अवघे 5 गुण कमावू शकले. पाटण्याच्या या कमकुवत बचावाचा तेलगूच्या चढाईपटूंनी पुरेपूर फायदा घेतला.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम
पाटणा पायरेट्सकडून मनजीत, प्रदीप नरवाल, आणि विजय यांनी चढाईत सर्वोत्तम कामगिरी केली, मात्र एकाही चढाईपटूने त्यांना चांगली साथ दिली नाही. अखेरच्या मिनीटांमध्ये पाटण्याच्या चढाईपटूंनी सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तेलगूने संयमी खेळ करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.