प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात पाटणा पायरेट्सला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तेलगू टायटन्सने पाटणा पायरेट्सवर 53-32 अशी एकतर्फी मात करत गतविजेत्यांना आणखी एक धक्का दिला आहे. राहुल चौधरीने आज सामन्यात चढाई आणि बचावात मिळून 20 गुणांची कमाई केली.
अवश्य वाचा – सहाव्या हंगामात प्रो-कबड्डीला अल्प प्रतिसाद, प्रेक्षकसंख्या घटल्याची माहिती
सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच तेलगू टायटन्सने आपलं वर्चस्व कायम राखलं. तेलगू टायटन्सचा महत्वाचा खेळाडू राहुल चौधरी आज फॉर्मात आला. पाटणा पायरेट्सच्या बचावफळीला खिंडार पाडत राहुलने संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या बाजूने निलेश साळुंखेनेही 7 गुणांची कमाई करत त्याला चांगली साथ दिली. बचावफळीतही तेलगू टायटन्सचा कर्णधार विशाल भारद्वाज यानेही 7 गुण मिळवत आपली छाप पाडली. विशालला मोहसीन मग्शदुलू, अबुझार मिघानी ने 3-3 गुण घेत चांगली साथ दिली. या अष्टपैलू खेळाच्या जोरावर पहिल्या सत्राच्या अखेरीस घेतलेली आघाडी तेलगूने अखेरपर्यंत कायम राखली.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 – गुजरात फॉर्च्युनजाएंटची पुणेरी पलटणवर मात
दुसरीकडे पाटणा पायरेट्सने घरच्या मैदानावर खेळत असताना निराशा केली. प्रदीप नरवालही आजच्या सामन्यात आपली छाप पाडू शकला नाही. विकास जगलानने चढाईत 9 गुण घेतले, त्याला प्रदीप नरवाल-तुषार पाटीलने 4-4 गुण घेत चांगली साथ दिली. मात्र दुसऱ्या बाजूने पाटण्याचे बचावपटू तेलगू टायटन्सच्या आक्रमणासमोर पुरते फोल ठरले. दुसऱ्या सत्रात अनेकदा पाटण्याच्या बचावपटूंनी तेलगू टायटन्सला गुण बहाल केले. या पराभवामुळे ब गटात तेलगू टायटन्सने आपलं अव्वल स्थान कायम राखलं असून गतविजेते पाटणा पायरेट्स चौथ्या स्थानावर घसरले आहेत.