प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात, बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चीत केल्यानंतर यू मुम्बा संघाने आपला विजयी धडाका सुरु ठेवला आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात यू मुम्बाने बंगाल वॉरियर्सवर ३१-२० ने मात करत पुन्हा एकदा अव्वल स्थान राखलं आहे. यू मुम्बाच्या संघाने आज अष्टपैलू खेळ केला, चढाईमध्ये सिद्धार्थ देसाईने सर्वाधिक ७ गुणांची कमाई केली. त्याला रोहित बलियान आणि दर्शन कादीयान या खेळाडूंनी चांगली साथ दिली. बंगालच्या बचावफळीला खिंडार पाडण्याचं मोठं काम या चढाईपटूंनी केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे, यू मुम्बाच्या बचावपटूंनीही आज तितकीच महत्वाची कामगिरी बजावली. सुरेंदर सिंह, कर्णधार फजल अत्राचली यांनी प्रत्येकी ४-४ तर धर्मराज चेरलाथनने ३ गुणांची कमाई केली. बंगाल वॉरियर्सच्या मणिंदर सिंह आणि रविंद्र कुमावत यांनी चढाईमध्ये चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही यू मुम्बाच्या बचावपटूंनी फारसं चालू दिलं नाही. अखेर यू मुम्बाने ३१-२० च्या फरकाने सामन्यात बाजी मारली.

Story img Loader