प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात यू मुम्बाने आतापर्यंतच्या इतिहासात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाविरुद्धचे सर्व हिशेब चुकते केले आहेत. दिल्लीच्या त्यागराज मैदानावर झालेल्या सामन्यात यू मुम्बाने गुजरातवर 36-26 ने मात करत अ गटातलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं. यू मुम्बाचे चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी आजच्या खेळात समान योगदान दिलं. यू मुम्बाचा गुजरात फॉर्च्युनजाएंट संघावरचा हा पहिला विजय ठरला आहे.

आजच्या संपूर्ण सामन्यात दोन्ही बाजूच्या बचावपटूंनी आपलं वर्चस्व राखलं. पहिल्या सत्रापासूनच दोन्ही संघातले बचावपटू प्रतिस्पर्धी चढाईपटूंच्या सुरेख पकडी करत होते. याचमुळे पहिल्या सत्राअखेरीस यू मुम्बाने गुजरातवर 17-14 अशी निसटती आघाडी घेतली. यू मुम्बाकडून धर्मराज चेरलाथन, रोहित राणा यांनी बचावफळीत चांगले गुण कमावले.

दुसऱ्या सत्रात यू मुम्बाकडून सिद्धार्थ देसाई, रोहित बालियान आणि गुजरातकडून सचिन तवंर यांनी चढाईत प्रामुख्याने गुण मिळवण्यास सुरुवात केली. यामध्ये सचिनची पकड करण्यात यू मुम्बाची बचावफळी यशस्वी ठरली. मात्र सिद्धार्थ आणि रोहितला जाळ्यात अडकवण्यात गुजरात अपयशी ठरल्यामुळे मोक्याच्या क्षणी यू मुम्बाने सामन्यात आघाडी घेतली. गुजरातकडून सचिन तवंरने एकाकी झुंज दिली, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. अखेरीस यू मुम्बाने 10 गुणांच्या फरकाने सामन्यात बाजी मारत आपलं अव्वल स्थान कायम राखलं.

Story img Loader