प्रो-कबड्डीच्या इतिहासातले पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या यू मुम्बा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स सामन्यात यू मुम्बाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली सहाव्या हंगामात प्रो-कबड्डीच्या मैदानात उतरलेल्या जयपूरला मुम्बाने ३९-३२ ने मात दिली. यू मुम्बाकडून कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईने चढाईत १३ गुणांची कमाई केली. प्रो-कबड्डीच्या इतिहासात जयपूरचा संघ आतापर्यंत एकदाही सलामीचा सामना जिंकू शकलेला नाहीये, दुर्दैवाने यंदाच्या हंगामातही हा पायंडा कायम राहिला.

पहिल्या सत्रात जयपूर पिंक पँथर्सच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत मुम्बाला पहिल्या काही मिनीटांमध्येच बाद केलं. जयपूरकडून चढाईत नितीन रावलने झटपट गुणांची कमाई करत मुम्बाच्या बचावफळीला खिंडार पाडलं. मात्र यानंतर यू मुम्बाने बचावपटूंच्या जोरावर सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. फजल अत्राचली, सुरेंदर सिंह यांनी काही सुरेख पकडी करत मुम्बाचं आव्हान सामन्यात कायम राखलं. यामुळे मध्यांतराला जयपूरचा संघ केवळ १५-१३ अशी २ गुणांची आघाडी घेऊ शकला.

मात्र दुसऱ्या सत्रात यू मुम्बाने सामन्याचं चित्र पुरतं पालटवून ठेवलं. सिद्धार्थ देसाईने मॅरेथॉन चढाया करत जयपूरच्या बचावफळीला खिंडार पाडलं. दुसऱ्या सत्रात जयपूरच्या संघाला दोन वेळा बाद करुन यू मुम्बाने सामन्यात मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात रोहित बालियानने सिद्धार्थ देसाईला दमदार साथ देत काही महत्वाचे गुण कमावले. यामुळे बॅकफूटवर गेलेला जयपूरचा संघ सामन्यात परतू शकला नाही. अखेर यू मुम्बाने सामन्यात ३९-३२ ने बाजी मारली.

Story img Loader