आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या यू मुम्बाने इंटर झोन चॅलेंज प्रकारात तामिळ थलायवाजवर ३६-२२ ने मात केली आहे. यू मुम्बाच्या संघाने केलेल्या अष्टपैलू खेळापुढे तामिळ थलायवाजचा संघ आपली छाप पाडू शकला नाही. या विजयासह यू मुम्बाने अ गटात आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या सामन्यात गतविजेते पाटणा विजयी, दिल्ली पराभूत

पहिल्या सत्रात तामिळ थलायवाजने यू मुम्बाला चांगली टक्कर दिली. मात्र यू मुम्बाने वेळेतच स्वतःला सावरत सामन्यात पुनरागमन केलं. दर्शन कादियान-सिद्धार्थ देसाई यांनी पहिल्या सत्रात यू मुम्बाचं आव्हान कायम राखलं. दुसऱ्या बाजूने विनोद कुमारनेही बचावात दोघांनाही चांगली साथ दिली. या खेळाच्या जोरावर यू मुम्बाने मध्यांतराला १८-१२ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रानंतर तामिळ थलायवाजचा संघ सामन्यात पुनरागमन करेल अशी सर्वांना आशा होती, मात्र ती देखील फोल ठरली. दुसऱ्या सत्रात यू मुम्बाच्या बचावफळीने फॉर्मात येत तामिळ थलायवाजच्या प्रमुख खेळाडूंना आपल्या जाळ्यात अडकवलं. कर्णधार फजल अत्राचली, सुरिंदर सिंह-रोहित राणा जोडीने सुरेख गुणांची कमाई करत आपल्या संघाचं पारडं जड ठेवलं. बदली खेळाडू अबुफजल मग्शदुलूनेही दुसऱ्या सत्रात काही चांगले गुण मिळवले. उद्यापासून प्रो-कबड्डीचे सामने अहमदाबादमध्ये रंगणार आहेत.