प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात यू मुम्बाने अ गटात आपलं अव्वल स्थान पुन्हा एकदा कायम राखलं आहे. पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात यू मुम्बाने दबंग दिल्लीचा 39-23 असा धुव्वा उडवला. चढाईपटू आणि बचावफळीचा अष्टपैलू खेळ हे यू मुम्बाच्या विजयाचं प्रमुख कारण ठरलं आहे.

सामन्याच्या पहिल्याच सत्रापासून यू मुम्बाने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. सिद्धार्थ आणि रोहित बालियानने आक्रमक चढाया रचत दबंग दिल्लीच्या बचावफळीला खिंडार पाडलं. या आक्रमणामुळे लय बिघडलेला दिल्लीचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. अभिषेक सिंहनेही सामन्यात चांगली कामगिरी बजावली. दुसऱ्या बाजूने यू मुम्बाच्या बचावपटूंनीही आज जोरदार खेळ केला. सुरिंदर सिंह, फजल अत्राचली, रोहित राणा यांनीही संघाची आघाडी कायम राखण्यात महत्वाची भूमिका बजावली.

दुसरीकडे दिल्लीच्या बचावफळीने आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. विशाल माने, रविंदर पेहल या अनुभवी खेळाडूंना आज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या चढाईपटूंनी या दोन्ही खेळाडूंना लक्ष्य करुन संघाबाहेर केलं. कर्णधार जोगिंदर नरवालने 3 गुणांची कमाई केली, मात्र तोपर्यंत यू मुम्बाने आपला विजय सुनिश्चीत केला होता. दिल्लीकडून चढाईमध्ये चंद्रन रणजीतने एकाकी झुंज दिली.

Story img Loader