प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात सध्या यू मुम्बाचा संघ आपलं अव्वल स्थान कायम राखून आहे. कोणत्याही अनुभवी खेळाडूला संघात स्थान न देता मैदानात उतरलेल्या यू मुम्बाने यंदा अनेक तगड्या संघांना आश्चर्याचा धक्का दिला. फजल अत्राचली आणि धर्मराज चेरलाथन या दोन अनुभवी बचावपटूंचा अपवाद वगळता यू मुम्बाचा संपूर्ण संघ हा तुलनेने नवीन आहे. 2 दिवसांपूर्वी यू मुम्बाने आपल्या घरच्या मैदानावरचे सामने खेळले. यादरम्यान यू मुम्बाने एका ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. सहाव्या हंगामात घरच्या मैदानावर खेळत असताना 4 सामने जिंकण्याचा पराक्रम यू मुम्बाने केला आहे. याआधी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाहीये.

घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळताना यू मुम्बाने तामिळ थलायवाजवर 36-22 अशी मात केली. या विजयासह मुम्बाच्या खात्यात अनोखा विक्रम जमा झाला. सध्या अ गटात यू मुम्बा आपलं अव्वल स्थान कायम राखून आहे. यू मुम्बाकडून आतापर्यंत चढाईमध्ये सिद्धार्थ देसाई, दर्शन कादियान, अभिषेक सिंह यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. तर अष्टपैलू विनोद कुमार, फजल अत्राचली यांनीही संघाचं स्थान अव्वल राखण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये यू मुम्बाचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader