प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात नोएडामध्ये आणखी एक सामना बरोबरीत सोडवला गेला आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना उत्तर प्रदेश संघाला तेलगू टायटन्सविरोधात बरोबरीत समाधान मानावं लागलं. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांमधला सामना 26-26 असा बरोबरीत सुटला. दोन्ही संघातील खेळाडूंनी आजच्या सामन्यात तुल्यबळ खेळ करत एकमेकांना विजयाची संधी दिली नाही.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : जयपूर पिंक पँथर्सची हरयाणा स्टिलर्सवर मात

उत्तर प्रदेशकडून सचिन कुमारने अष्टपैलू खेळ केला. सचिनने चढाई व बचावात मिळून 5 गुणांची कमाई केली. त्याला श्रीकांत जाधव आणि रिशांक देवाडीगाने प्रत्येकी 4-4 गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. महत्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेशच्या बचावफळीनेही आजच्या सामन्यात तोडीस तोड खेळ करत आपल्या संघाचं आव्हान कायम राखलं. तेलगू टायटन्सच्या प्रमुख खेळाडूंची पकड करत उत्तर प्रदेशने तेलगूला आघाडी घेऊ दिली नाही. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते. तेलगू टायटन्सकडून मोहसीन मग्शदुलू आणि निलेश साळुंखेने चढाईत प्रत्येकी 4-4 गुण कमावले. त्यांना बचावफळीतही चांगली साथ मिळाली. मात्र शेवटच्या काही सेकंदात गुण मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तेलगूच्या चढाईपटूंनी सामना बरोबरीत सोडवणं पसंत केलं.

Story img Loader