घरच्या मैदानावर खेळणाऱ्या यूपी योद्धा संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगळुरु बुल्स संघाने उत्तर प्रदेशवर 35-29 ने मात केली आहे. कर्णधार रोहित कुमार आणि पवन शेरावतच्या आक्रमक चढाया व त्यांना बचावपटूंनी दिलेली साथ या जोरावर बंगळुरुने आजच्या सामन्यात बाजी मारली. दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या संघानेही चांगला खेळ केला. मात्र बचावपटूंनी मोक्याच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे उत्तर प्रदेशचा संघ सामन्यात पराभूत झाला.

बंगळुरुकडून कर्णधार रोहित कुमारने आज सामन्यात 14 गुणांची कमाई केली. उत्तर प्रदेशच्या बचावफळीतले कच्चे दुवे शोधून काढत रोहितने गुण मिळवण्याचा सपाटाच लावला. त्याला दुसऱ्या बाजूने युवा खेळाडू पवन शेरावतने चांगली साथ दिली. या खेळाच्या जोरावर बंगळुरुने सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. बंगळुरुच्या बचावपटूंनीही आज चांगली कामगिरी केली. काशिलींग अडकेने आज बचावात 3 गुणांची कमाई करत बंगळुरुचा आजच्या सामन्यातला सर्वोत्तम बचावपटू होण्याचा मान मिळवला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : पुणेरी पलटणची यू मुम्बासमोर शरणागती

यूपी योद्धाकडून आज प्रशांत कुमार राय, श्रीकांत जाधव यांनी चढाईत आपली कामगिरी चोख बजावली. दोघांनीही चढाईत अनुक्रमे 7 व 5 गुण कमावले. दोन्ही खेळाडूंच्या आक्रमक खेळामुळे उत्तर प्रदेशने काहीकाळ सामन्यात आपलं आव्हान कायम राखलं होतं. मात्र मोक्याच्या क्षणी उत्तर प्रदेशचे बचावपटू आपल्यावर नियंत्रण ठेऊ शकले नाहीत. अखेरच्या काही मिनीटांमध्ये केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे बंगळुरुने सामन्यात आपली आघाडी कायम राखत विजय संपादन केला.

Story img Loader