प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात कबड्डी प्रेमींना आज आणखी एक सामना बरोबरीत सुटताना पहावं लागलं. पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या सामन्यामध्ये यूपी योद्धा संघाने बंगाल टायगर्स संघाला बरोबती रोखलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या प्रशांत कुमार रायने अखेरच्या चढाईत बोनस गुणाची कमाई करत सामना 40-40 असा बरोबरीत सोडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही संघातल्या खेळाडूंनी आज तोडीस तोड खेळ केला. उत्तर प्रदेशकडून प्रशांत कुमार राय, कर्णधार रिशांक देवाडीगा यांनी चढाईत आक्रमक खेळ केला. प्रशांतने 13 तर रिशांकने चढाईत 9 गुणांची कमाई केली. या दोन्ही खेळाडूंना उत्तर प्रदेशच्या इतर खेळाडूंनी चांगली साथ देत, आपल्या संघाचं पारडं सामन्यात वरती ठेवलं. या जोरावर उत्तर प्रदेशने मध्यांतराला 18-15 अशी 3 गुणांची आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात बंगाल वॉरियर्सच्या खेळाडूंनीही दमदार पुनरागमन करत उत्तर प्रदेशला धक्का दिला. बंगालकडून चढाईमध्ये मणिंदर सिंहने गुण मिळवण्याचा सपाटाच सुरु ठेवला. मणिंदरने आजच्या सामन्यात चढाईमध्ये तब्बल 16 गुण कमावले. त्याला जँग कून लीने 7 मिळवत चांगली साथ दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे बंगालच्या बचावफळीनेही आज काही चांगल्या पकडी करुन सामन्यात रंगत आणली. मात्र उत्तर प्रदेशच्या प्रशांत कुमार रायने अखेरच्या चढाईत बोनस गुणाची कमाई करत सामना बरोबरीत सोडवला.