प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात यू मुम्बाच्या खेळाडूंनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. लिलावादरम्यान अनुभवी खेळाडूंना डावलून तरुणांना संधी दिली होती. यू मुम्बाच्या या रणनितीमुळे अनेक चाहते नाराजही झाले होते. मात्र प्रत्यक्ष सामन्यांमध्ये मुम्बाच्या संघाने सर्वांना आश्चर्यचकीत व्हायला भाग पाडलं. अ गटात धडाकेबाज खेळी करत यू मुम्बाने पुढच्या फेरीसाठी आपलं स्थान पक्क केलं आहे. सिद्धार्थ देसाई, फजल अत्राचली यांनी सहाव्या हंगामात विविध प्रकारच्या गुणतक्त्यांमध्ये दिग्गज खेळाडूंना माघारी टाकत अव्वल स्थान कायम राखलं आहे.

दबंग दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सिद्धार्थ देसाईने १२ गुणांची कमाई करत सहाव्या हंगामात २०० गुणांचा टप्पा गाठला. चढाईमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही सिद्धार्थ १९७ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. याचसोबत यशस्वी चढाई करणाऱ्या प्रकारातही सिद्धार्थने पहिलं स्थान कायम राखलंय.

दुसरीकडे यू मुम्बाचा कर्णधार फजल अत्राचलीनेही बचावफळीत आपला दबदबा कायम राखला आहे. High 5, Super Tackle आणि Tackle Points या प्रकारात पहिलं स्थान कायम राखलं आहे. दबंग दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही फजलने आपली चमक दाखवली होती. गुजरातच्या परवेश भैंसवालकडून फजलला यंदा चांगली लढत मिळते आहे, त्यामुळे सत्राच्या अखेरीस कोणता खेळाडू बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader