प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) १३२ व्या सामन्यात पटणा पायरेट्सने हरियाणा स्टीलर्सला ३०-२७ पराभूत करत थेट स्पर्धेतून बाहेर काढलं. दिग्गज खेळाडू राकेश कुमारचा हरियाणा स्टीलर्स संघ स्पर्धेबाहेर झाल्याने अनूप कुमारच्या पुणेरी पलटन संघाने सहावा संघ म्हणून प्लेऑफमध्ये आपली जागा कायम केलीय. पटणा पायरेट्स २२ सामन्यांपैकी १६ सामने जिंकून ८६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
अखेरच्या क्षणी हरियाणा स्टीलर्सच्या हातून सामना निसटला
सुरुवातीला पटणा पायरेट्स संघ १७-१४ असा पुढे होता. पटणा पायरेट्सने सामन्याच्या सुरुवातीलाच हरियाणा स्टीलर्सला सर्वबाद करत चांगली कामगिरी केली. मात्र, हरियाणाने दमदार पुनरागमन करत पटणाचा संपूर्ण संघ बाद केला. पटणा पायरेट्सकडून सचिनने ६ आणि गुमान सिंहने ३ रेड पॉइंट घेतले. हरियाणा स्टीलर्सकडून आशिषने ४ रेड आणि जयदपीने २ टँकल पॉइंट घेतले.
दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीचे १० मिनिटे सामन्यात जबरदस्त लढत पाहायला मिळाली. पहिल्या स्ट्रॅटेजिक टाइम आउटच्या वेळी ३० मिनिटांनंतर पटणा पायरेट्सने सामन्यात २३-२१ अशी आघाडी घेतली. पुढील ५ मिनिटात पटणा पायरेट्सने ५ अकांची आघाडी घेतली, मात्र दुसऱ्या स्ट्रॅटेजिक टाइम आउटनंतर हरियाणा स्टीलर्सने लागोपाठ ५ पॉइंट घेऊन सामना बरोबरीत आणला. याशिवाय अखेरच्या मिनिटात पटणा पायरेट्सने ३ पॉइंट घेत सामना खिशात टाकला आणि हरियाणाच्या हातातून सामना तर घेतलाच सोबत त्यांना स्पर्धेबाहेर काढलं.
हेही वाचा : नव्या दमाच्या खेळाडूंवर संघांची भिस्त!
पटणा पायरेट्सकडून मोहम्मदरज़ा शादलुने पुन्हा ५ टॅकल पॉइंट घेतले, सचिनने रेडिंगमध्ये सर्वाधिक ८ पॉइंट घेतले. हरियाणा स्टीलर्सकडून डिफेंसमध्ये जयदीपने ५ पॉइंट घेतले, रेडिंगमध्ये आशिषने सर्वाधिक ८ पॉइंट घेतले. कर्णधार विकास कंडोला (4 पॉइंट) अपयशी ठरल्याने संघाला मोठं नुकसान सहन करावं लागलं.