प्रो-कबड्डीच्या स्पर्धेमाध्यमातून देशातील तरुण पिढीला कबड्डीची नव्याने ओळख करुन देणाऱ्या अनुप कुमारने आज कबड्डीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. प्रो-कबड्डीत पहिले पाच पर्व यू मुम्बाकडून खेळणाऱ्या अनुप कुमारला सहाव्या हंगामात जयपूर पिंक पँथर्स संघाने आपल्या संघात घेतलं होतं. मात्र यंदाच्या हंगामात अनुप आणि जयपूरच्या संघाला आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे पंचकुलात सुरु असलेल्या सामन्यांदरम्यान अनुपने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत अनुपने विविध संघाचं नेतृत्व केलं. भारतीय संघाला आशियाई खेळ आणि विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देण्यातही अनुपचा मोठा वाटा होता. काही काळासाठी अनुपने भारताच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचंही यशस्वीपणे नेतृत्व केलं होतं. प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात अनुप जयपूर पिंक पँथर्स संघाकडून १३ सामने खेळला, यामध्ये त्याने ५० गुणांची कमाई केली. याचसोबत प्रो-कबड्डीच्या सहा हंगामात मिळून अनुपने ९१ सामन्यांमध्ये ५९६ गुणांची कमाई केली आहे.

Story img Loader