२०१४ साली आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या प्रो-कबड्डीने प्रेक्षकांची मनं जिंकली. गेले ५ हंगाम टेलिव्हीजनवर या खेळाच्या प्रेक्षकसंख्येतही चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं. गेल्या काही वर्षांमध्ये कबड्डीने क्रिकेटनंतर सर्वाधीक प्रेक्षकांची पसंती मिळवलेला खेळ बनण्याचा मान पटकावला. मात्र यंदाच्या हंगामात कबड्डीचे चाहते व आयोजक यांच्यासाठी एक चिंतेची बातमी आहे. BAARC ने दिलेल्या आकडेवारीनुसार सहाव्या हंगामात पहिल्या काही आठवड्यानंतर प्रो-कबड्डीची टेलिव्हीजनवरची प्रेक्षकसंख्या कमी झाल्याचं समोर येतंय.

Economic Times वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, सहाव्या हंगामात पहिल्या १२ सामन्यांनंतर प्रो-कबड्डीच्या प्रेक्षकसंख्येत ३१ टक्क्यांनी घट झाली आहे. शहरी भागात ही घट २५ टक्के तर ग्रामीण भागात ही घट ३३ टक्क्यांवर गेलेली आहे. तब्बल 12 संघाचा सहभाग असलेली ही स्पर्धा तब्बल ९ वाहिन्यांवरुन प्रसारित केली जाते. देशभरात अंदाजे २३ कोटी ७ लाख लोकांनी सहाव्या हंगामातले पहिले २४ सामने पाहिले. पाचव्या हंगामात पहिले २४ सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ही अंदाजे ३४ कोटीच्या घरात होती. याचसोबत सामने प्रसारित करणाऱ्या ९ वाहिन्यांपैकी एकाच वाहिनीला जास्त टीआरपी मिळालेला आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 – दिग्गज खेळाडूंना मागे टाकत यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईची यशस्वी चढाई

प्रो-कबड्डीची प्रेक्षकसंख्या घटण्याची अनेक कारणं दिली जात आहेत. पहिल्या पाच हंगामांच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रो-कबड्डीचं मार्केटिंग चांगलं झालं नाही. कबड्डी महासंघावर दिल्ली हायकोर्टाने प्रशासक नेमल्यानंतर काही काळ प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. याचदरम्यान आयोजकांनी स्पर्धा दोन दिवस उशीराने सुरु केली. याचसोबत गेल्या काही महिन्यांमध्ये भारताच्या विविध भागांमध्ये सणांचं वातावरण होतं, यावेळी प्रेक्षकांचा टिव्ही पाहण्याकडे कल कमी असतो. त्यामुळे उरलेल्या काही हंगामात प्रो-कबड्डी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : ‘डुबकी किंग’ प्रदीप नरवालने मोडला राहुल चौधरीचा विक्रम

Story img Loader