प्रो-कबड्डी स्पर्धेने चमत्कार घडवला. या स्पर्धेमुळे कबड्डीच्या देशभरातील विकासाला चालना मिळाली आहे, असे उद्गार अर्जुन पुरस्कारप्राप्त माजी कबड्डीपटू राजू भावसार यांनी काढले. भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाच्या अहमदाबाद येथे सुरू असलेल्या वार्षिक अधिवेशनात प्रो-कबड्डीवर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
‘१९९० साली बीजिंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदकावर कब्जा केला होता. या ऐतिहासिक विजयानंतर देशभरातील कबड्डीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी अपेक्षा होती. मात्र मायदेशी परतल्यानंतर सरकारी अनास्थेनेच आमचे स्वागत केले. आमच्या स्वागताला संघटनेतर्फे, क्रीडा मंत्रालयातर्फे कोणीही हजर नव्हते. खेळाडू सार्वजनिक वाहनांनी घरी रवाना झाले. सर्वच खेळाडूंना निराश करणारे असे ते वातावरण होते. मात्र प्रो-कबड्डी स्पर्धेने गोष्टी बदलल्या आहेत. लहान मुले, स्त्रिया यांचाही प्रो-कबड्डीच्या प्रेक्षकांमध्ये समावेश होता. ही स्वागतार्ह गोष्ट आहे,’असे भावसार यांनी सांगितले.
तीन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या राकेश कुमारनेही भावसार यांच्या मताला दुजोरा देत आपली भूमिका मांडली. प्रो-कबड्डीमुळे खेळाला व्यावसायिकता लाभली आहे. खेळाडूंना नवी ओळख मिळाली असून, चाहत्यांचा पाठिंबा थक्क करणारा आहे, असे राकेशने सांगितले.
‘प्रो-कबड्डी स्पर्धेच्या स्वरूपामुळे खेळ वेगवान झाला आहे. बचावपटूंनाही श्रेय मिळू लागले आहे. कोणत्याही साहित्याशिवाय खेळणारे दोन संघ ही गोष्टच अनोखी आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) नंतर अन्य कोणत्याच लीगला एवढी लोकप्रियता आणि यश मिळालेले नाही,’ असे मत शिवछत्रपती पुरस्कार विजेच्या खेळाडू गौतमी राऊत यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा