उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने १४ हजार प्रेक्षकक्षमतेच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर
गेल्या दोन हंगामांमध्ये स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगच्या अंतिम फेरीसाठी ऑनलाइन आणि तिकीट विक्री खिडकीवर ‘हाऊस फुल्ल’चा फलक दिसतो आहे. आतापर्यंतचे सर्व उपांत्य आणि अंतिम सामने मुंबईच्या सरदार वल्लभभाई स्टेडियमवर झाले होते. परंतु या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता फक्त पाच हजार इतकी आहे. यावर मात करण्यासाठी प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामाचे बाद फेरीचे चार सामने नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर आयोजित करून आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे जवळपास १५ हजार क्रीडाशौकिनांना या सामन्यांचा प्रत्यक्ष आनंद लुटता येणार आहे.
आतापर्यंतच्या प्रो कबड्डीच्या तीन हंगामांमध्ये किमान पाच हजार प्रेक्षकक्षमतेची स्टेडियम्स वापरण्यात आली होती. मात्र तिकिटांची वाढती मागणी लक्षात घेऊन राजधानीत होणाऱ्या या सामन्यासाठी प्रथमच मोठे स्टेडियम वापरण्यात येत आहे. याविषयी प्रो कबड्डीचे समन्वयक चारू शर्मा म्हणाले, ‘‘सामन्यागणिक प्रो कबड्डीचा ज्वर वाढत जातो. अंतिम चार संघांमधील लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचते. उपांत्य आणि अंतिम सामने पाहण्याची अधिकाधिक लोकांना
संधी मिळावी, यासाठी आम्ही मोठय़ा स्टेडियमची निवड केली आहे. दिल्ली हे मोठे शहर आहे. शिवाय उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान आणि पंजाब या शेजारील राज्यांतूनही काही कबड्डीरसिक या सामन्यांसाठी येतील, अशी आमची अपेक्षा आहे.’’
याबाबत भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज चतुर्वेदी म्हणाले की, ‘‘प्रो कबड्डीची लोकप्रियता वाढते आहे. क्रीडारसिकांना हे सामने स्टेडियममध्ये पाहण्याची उत्सुकता असते. याचप्रमाणे जगभरातील कबड्डी संदर्भातील अनेक मंडळींना या सामन्यासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे. खेळ अनेक देशांमध्ये पोहोचावा, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.’’

Story img Loader