‘नवी विटी, नवा दांडू’ हेच धोरण जपून प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी संयोजक सज्ज झाले आहेत. पहिल्या हंगामात सर्वसामान्य कबड्डी सामन्यांना वेग आणि रोमहर्षकतेचे कोंदण लावल्यानंतर आता यंदाच्या हंगामात आणखी काही नव्या नियमांमुळे आणि शब्दांमुळे प्रो कबड्डीच्या आकर्षकतेमध्ये अधिक भर पडण्याची चिन्हे आहेत.

एखाद्या संघातील सर्व खेळाडू बाद होतात, तेव्हा प्रतिस्पर्धी संघ त्यांच्यावर लोण चढवतो. परंतु या प्रक्रियेचे आता ‘ऑल आऊट’ असे नामकरण करण्यात आले आहे. याशिवाय ‘टाइम आऊट’ची संख्या कमी करण्यात आली असून, दोन्ही संघांनी संपूर्ण सामन्यात प्रत्येकी एकदाच याअंतर्गत रणनीती आखण्यासाठी विश्रांती घेता येणार आहे आणि याकरिता ९० सेकंदांचा वेळ जाहिरातींसाठी वापरता येणार आहे. मागील हंगामात सामन्याच्या प्रत्येक संघाला, प्रत्येक सत्रात ३० सेकंदांचे दोन ‘टाइमआऊट’ घ्यायची परवानगी होती. मात्र प्रशिक्षकांचे मार्गदर्शन (कोचिंग कन्सल्टेशन) याकरिता प्रत्येक सामन्यात दोनदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या संघाचा चढाईपटू समोरच्या अंगणात असताना एका विशिष्ट जागेत जाऊन प्रशिक्षक संपूर्ण सामन्यात दोनदा आपल्या संघाला मार्गदर्शन करू शकेल. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामात हवे तेवढे खेळाडू बदली करायला परवानगी होती. त्यामुळे चढाईच्या वेळी उत्तम चढाईपटू तर क्षेत्ररक्षणाच्या वेळी उत्तम पकडपटू मैदानावर असेल, अशा रीतीने बदल केले जायचे. परंतु यंदा मात्र त्यावर बंधने घालण्यात आली असून, संपूर्ण सामन्यात प्रत्येक संघाला जास्तीत जास्त पाच वेळा खेळाडूंना बदलता येणार आहेत. बदली खेळाडू हातात फलक घेऊन फुटबॉलप्रमाणे एका विशिष्ट जागी उभा राहील आणि काही सेकंदांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी पंच पुनर्आढावा प्रक्रियेचा (टीव्ही रेफरल) वापर करण्यात आला होता. यावेळी साखळीच्या सामन्यांपासून ती वापरली जाण्याची शक्यता होती. मात्र यावेळीसुद्धा फक्त बाद फेरीच्या सामन्यांसाठी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
यंदा प्रो कबड्डीच्या सामन्यांसाठी पंचांची संख्यासुद्धा वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुख्य पंच (रेफरी) आणि दोन साहाय्यक पंच आणि दोन साहाय्यक गुणलेखक सामन्याचे निरीक्षण करायचे. परंतु प्रो कबड्डीत यावर्षीपासून दोन संघांच्या डग आऊटमध्ये बसून बदली खेळाडूंची नोंद, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची नोंद आदी करण्यासाठी आणखी एकेक पंचाची नियुक्ती करण्यात आली आहे.

क्रीडारसिकांना हा खेळ समजणे अधिक सोपा जावा आणि खेळातील रंगत अधिक वाढावी म्हणून हे बदल करण्यात आले आहेत.
ई. प्रसाद राव (भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या तांत्रिक समितीचे प्रमुख)

Story img Loader