प्रो-कबड्डी लीगच्या दुसऱ्या दिवशी यू मुंबा संघाची दुसरी लढत बंगाल वॉरियर्सशी असेल, तर पुणेरी पलटण आपल्या अभियानाची सुरुवात बंगळुरू बुल्सविरुद्धच्या लढतीने करणार आहे. त्यामुळे रविवारी क्रीडारसिकांना मुंबई आणि पुणे अशा दोन्ही लढतींची खमंग मेजवानी लाभणार आहे.
वझीर सिंगच्या नेतृत्वाखालील पुणे संघ विजयानिशी हंगामाला प्रारंभ करण्यासाठी उत्सुक आहे. नितीन मोरे, प्रवीण नेवाळे, मनोज कुमार, महिपाल नरवाल आणि जितेश जोशीवर पुणेरी संघाची मदार असेल. याचप्रमाणे बंगळुरू संघाची मनजित चिल्लर, अजय ठाकूर, गुरुप्रीत सिंग आणि धर्मराज चेरलाथन यांच्यावर भिस्त असेल. नीलेश शिंदेच्या नेतृत्वाखाली बंगाल वॉरियर्स संघ आपला पहिलाच सामना यजमान यू मुंबा संघाशी खेळणार आहे.
महाराष्ट्राचा गुणी खेळाडू नितीन मदनेचा खेळ पाहण्याची संधी या वेळी रसिकांना मिळणार आहे. सुरजित सिंग, फरहाद कुमार यांची त्याला सुरेख साथ मिळेल. मुंबा संघाकडून अनुप कुमार, जीवा कुमार, रोहित कुमार आणि रिशांक दिवाडिगा यांच्या खेळाचा कस लागेल.
यू मुंबा संघाचे प्रशिक्षक रवी शेट्टी म्हणाले की, ‘‘आम्ही प्रत्येक सामन्याच्या दृष्टीने रणनीती निश्चित केली आहे. त्यामुळे चारही दिवसांच्या योजना आमच्याकडे तयार आहेत.’’

Story img Loader