प्रो-कबड्डीच्या लीगच्या पहिल्या हंगामाला चांगले यश मिळाल्यामुळे आता हा एक चांगला ब्रॅण्ड निर्माण झाला आहे. प्रो-कबड्डीतील गुंतवणुकीचा आकडा आणि खेळाडूंवरील लिलावातील बोलीचा आकडा हा वाढतच जाणार आहे. कारण प्रो-कबड्डीला महसुलाचे गणित जमले आहे, असे मत जयपूर पिंक पँथर्सचा मालक अभिषेक बच्चनने व्यक्त केले. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाच्या पाश्र्वभूमीवर अभिषेकशी केलेली खास बातचीत-

एक वर्ष झाल्यानंतर संघमालक या नात्याने प्रो-कबड्डीतील गुंतवणुकीकडे कसे पाहतोस?
मागील वर्षी लीगचे पहिले पाऊल होते. राकेश कुमारला सर्वाधिक १२ लाख ८० हजार रुपयांची बोली लागली होती. दुसऱ्या हंगामात आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताला अंतिम सामन्यात झगडायला लावणाऱ्या इराणच्या दोन खेळाडूंनी २० लाखांचा टप्पा पार केला. लिलावात खेळाडूंवर लागणाऱ्या बोलीचा आकडा वाढतच जाणार आहे. पहिल्या हंगामात संयोजक मशाल स्पोर्ट्सने सावधगिरी म्हणून संघांना खेळाडू खरेदी करण्यासाठी दिलेल्या रकमेचा आकडा मर्यादित ठेवला होता. फ्रेंचायझी डबघाईला येऊ नये, हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. एक चांगला ब्रॅण्ड निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता, परंतु पहिल्याच हंगामात प्रो-कबड्डीला अभूतपूर्व यश मिळाले. आम्ही खेळाडूंशी दोन वर्षांचे करार केले आहेत. त्यामुळे या खेळाडूंवर पुढील वर्षी पुन्हा बोली लागतील. हे आकडे आता वाढतच जाणार आहेत. कारण प्रो-कबड्डीला महसुलाचे गणित जमले आहे.
कबड्डी संघाचा मालक होणे, हे किती आव्हानात्मक असते?
प्रो-कबड्डीला जेव्हा प्रारंभ व्हायचा होता, तेव्हा या खेळाला नव्या रूपात लोकांसमोर सादर करण्याचे आव्हान आमच्यापुढे होते. खेळाडूंचा आहार, तंदुरुस्ती याकडे कशा रीतीने पाहतात, याची आम्ही त्यांना जाणीव करून दिली. खेळाडूंना आहारज्ञान देताना संघव्यवस्थापनाला मोठी कसरत करावी लागली. तंदुरुस्ती कशी चांगली राखावी आणि दुखापती कमी कराव्यात, याचे प्रशिक्षण त्यांना दिले गेले.
आयपीएलमध्ये स्पॉट-फिक्सिंग, सट्टेबाजी आदी तक्रारी वाढत चालल्या आहेत. प्रो-कबड्डीत अशा प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी कोणती काळजी घेतली जाते?
कबड्डी खेळणारे बहुतांशी खेळाडू हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि फार प्रामाणिक आहेत. आम्ही प्रो-कबड्डीत अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून दूर राहील, याची सर्व मंडळी काटेकोरपणे काळजी घेत आहोत. भारतीय हौशी कबड्डी महासंघसुद्धा उत्तेजक द्रव्ये पदार्थाचे सेवन आदी गैरप्रकारांची गंभीर दखल घेते. एक संघमालक म्हणून मी त्यांच्याशी नियमितपणे बोलत असतो. कबड्डीत गुंतवणूक करण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा आहे. माझ्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी खेळाडू घेतील.
प्रो-कबड्डी, आयएसएल आणि चित्रपट या सर्व गोष्टींचा समतोल कसा काय साधतोस?
एकीकडे अभिनेता आणि खेळांमध्ये एक संघमालक म्हणून असणे, हे माझ्यासाठी आनंददायी आहे. एक दिवसाचे २४ तास असतात. तीन-चार तास झोपण्यासाठी पुरेसे असतात. सर्वात प्रथम मी एक कलावंत आहे. मागील वर्षी प्रो-कबड्डीचे दोन महिने मी चित्रपटउद्योगातून रजा घेतली होती आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. महत्त्वाच्या चित्रपटांचे शूटिंगसुद्धा झाले होते. यंदासुद्धा संघासोबत विविध ठिकाणी जाताना येणाऱ्या चित्रपटाची प्रसिद्धी करणे हे आणखी एक आव्हान माझ्यापुढे असेल. आपण एखादी गोष्ट ठरवली तर आपण नक्की त्यासाठी वेळ काढू शकतो असे मला वाटते.
क्रीडा क्षेत्रात तू स्वत:चा एक ब्रॅण्ड म्हणून कसा विचार करतो?
मी अजून तशा प्रकारे कधीच विचार केला नाही. यातून किती फायदा होईल, हा विचार मी केला नाही. मी खेळाचा आनंद लुटतो, म्हणून प्रो-कबड्डी आणि आयएसएलशी नाते जोडले आहे. यातून मलाही काही शिकायला मिळते आहे. माझ्या ब्रॅण्डला याची कशी मदत होईल, याचा मी विचार केला नव्हता. पण खेळाला मदत होईल, ही जाणीव होती.
कबड्डीसाठी खास स्टेडियम बांधण्याचे फ्रेंचायझींचे धोरण कुठवर आले आहे?
आम्ही याबाबत फारशी प्रगती करू शकलेलो नाही. एक कबड्डी स्टेडियम बांधणे, हे अतिशय खर्चिक असते. परंतु आमच्या फ्रेंचायझीमध्ये जितके भागधारक आहेत, या सर्वाना कबड्डीचे खास स्टेडियम असावे, असे मनापासून वाटते आहे. परंतु यासाठी थोडा वेळ लागेल.
खेळावर आधारित एखादा चित्रपट बनवायचे ठरवले, तर कोणती भूमिका करायला तुला आवडेल?
कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करून मैदानावर परतणाऱ्या क्रिकेटपटू युवराज सिंगच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या मी विचारात आहे. हीच भूमिका साकारायला मला आवडेल.

Story img Loader