चतुरस्र खेळाने जयपूरची २४-२२ अशी बाजी

संयमी खेळ करत जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी लीगच्या बुधवारी झालेल्या सामन्यात यजमान बंगळुरू बुल्सला पराभूत केले. बंगळुरूच्या कांतिरावा स्टेडियमवरील लढतीत पँथर्सने २४-२२ असा विजय मिळवला. घरच्या मैदानावरील बंगळुरूचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

पहिल्या सत्रात बंगळुरूने सुरुवातीच्या क्षणाला ५-१ अशी आघाडी घेऊनही त्यांना जयपूरवर लोण चढवता आला नाही. दीपक कुमार दाहियाने दुसऱ्याच मिनिटाला चढाईत तीन गुणांची कमाई करून बंगळुरूला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सलग दोन गुण कमवत बंगळुरूने सामन्यावर पकड घेतली, परंतु त्यानंतर जयपूरकडून चतुरस्र खेळ झाला. सातव्या मिनिटाला अमित हुडाने बंगळुरूच्या रोहित कुमारची सुपर पकड करून जयपूरला ५-४ असे संघाला सामन्यात परत आणले. सहाव्या मिनिटानंतर बुल्सला गुणासाठी १३व्या मिनिटाची वाट पाहावी लागली. पँथर्सने १६व्या मिनिटाला यजमानांवर लोण चढवत १३-८ अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत त्यांनी १५-९ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करत बंगळुरूने पहिल्याच मिनिटाला रोहितच्या एका चढाईत दोन गुणांची कमाई केली. त्यात २४व्या मिनिटाला आशीष कुमारने दोन गुणांची भर घातली. पुढच्याच मिनिटाला जसवीर सिंगची पकड करून बंगळुरूने सामन्यातील पहिला लोण चढवत १७-१६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही संघांनी सावध खेळ करत एक एक गुण घेत सामन्याचे चित्र हलते ठेवले. ३४व्या मिनिटाला २१-२० असे बुल्स आघाडीवर होते, परंतु त्यांच्याकडून झालेल्या तांत्रिक चुकीमुळे जयपूरला एक गुण देण्यात आला. त्यानंतर कोणतीही जोखीम न पत्करता जयपूरने आघाडी घेत २४-२२ असा विजय मिळवला.

आजचे सामने

  • जयपूर पिंक पँथर्स वि. यू मुंबा
  • बंगळुरू बुल्स वि. पाटणा पायरेट्स
  • वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

आइस दिवाजचा सहज विजय

कर्णधार अभिलाषा म्हात्रे (५) आणि मोनू (४) यांच्या खेळाच्या जोरावर आइस दिवाजने महिला चॅलेंजर स्पध्रेत फायर बर्ड्सवर २४-१४ अशी सहज मात केली. ललिता आणि खुशबू नरवाल यांनी पकडीत प्रत्येकी तीन, तर सोनाली शिंगटे व मीनल जाधव यांनी चढाईत अनुक्रमे २ व ४ गुणांची कमाई करून विजयात खारीचा वाटा उचलला.

मनजित पुढील सामन्याला मुकणार?

बंगाल वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे पुण्याचा कर्णधार मनजित चिल्लर शुक्रवारच्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. मंगळवारी बंगळुरू येथील कांतिरावा स्टेडियमवर झालेल्या लढतीत त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संघ व्यवस्थापकांनी यावर भाष्य करण्याचे टाळले. मात्र, बंगालचा कर्णधार नीलेश शिंदे याने सामन्यानंतर मनजितच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली होती.

 

 

Story img Loader