प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाला क्रीडा रसिकांचा अजुनही पाठींबा मिळताना दिसत आहे. BARC (बार्क) ने दिलेल्या आकडेवारीनूसार पहिल्या आठवड्यात तब्बल १३ कोटी २० लाख लोकांनी प्रो-कबड्डीचे सामने पाहिले आहेत. यातही भारताच्या ग्रामीण भागात ९ कोटी तर भारताच्या शहरी भागात अंदाजे ४ कोटी २० लाख लोकांच्या घरात कबड्डीचे सामने पाहिले गेले आहेत.
प्रो-कबड्डीचं प्रेक्षपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स या वाहिनीलाही या आठवड्यादरम्यान चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्टार स्पोर्ट्स फर्स्ट वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या प्रो-कबड्डीच्या क्षणचित्रांनाही (हायलाईट्स) प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या आठवड्यात सामन्यांच्या हायलाईट्सला तब्बल ३ कोटी ६० लाख लोकांनी आपली पसंती दर्शवली. बार्कच्या आकडेवारीनूसार कबड्डीच्या हायलाईट्सना तब्बल २८ टक्के प्रतिसाद मिळाला होता.
आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात कबड्डीच्या सामन्यांना मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पहिल्या आठवड्यात कर्नाटकात प्रो-कबड्डीच्या सामन्यांना ५२ टक्के, आंध्रप्रदेशमध्ये ४० टक्के तर महाराष्ट्रात ३४ टक्के प्रेक्षकवर्ग मिळालेला आहे. याव्यतिरीक्त उत्तरप्रदेश राज्याच्या प्रेक्षकवर्गातही दुपटीने वाढ झालेली आहे. चौथ्या पर्वाची तुलना केली असता, पहिल्या १३ सामन्यांनंतर प्रो-कबड्डीच्या प्रेक्षकवर्गात ५९ टक्क्यांची वाढ झालेली आहे.
प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात ४ संघाचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम हा ३ महिने चालणार आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वाला लोकं कितपत प्रतिसाद देतील ही सर्वांच्या मनात शंका होती. मात्र सुरुवातीच्या आठवड्यातली आकडेवारी पाहता, प्रो-कबड्डीला क्रीडारसिकांचा प्रतिसाद मिळतोय असंच म्हणावं लागेल.
अवश्य वाचा – प्रो-कबड्डीला प्रेक्षकांची पसंती कायम, पहिल्या दिवशी गाठला ५ कोटींचा प्रेक्षकवर्ग