मणिंदर सिंहने अखेरच्या चढाईत मिळवलेल्या बोनस गुणाच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पँथर्सचा ३२-३१ असा एका गुणाच्या फरकाने पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात जयपूरच्या संघाकडे नाममात्र एका गुणाची आघाडी होती. मात्र मणिंदर सिंहने अखरेच्या सेकंदात केलेल्या चढाईने बंगालने जयपूरच्या तोंडचा घास पळवला.
मणिंदरने आजच्या सामन्यात चढाईत बंगालसाठी १६ गुणांची कमाई केली. प्रत्येक वेळी सामन्यात बंगालच्या संघाचं आव्हान कायम ठेवण्याचं काम मणिंदरने केलं. त्याला दीपक नरवालने ४ गुण मिळवत चांगली साथ दिली. कर्णधार सुरजित सिंहचा अपवाद वगळता बचावफळीत रणसिंह आणि श्रीकांत तेवतिया यांनी ७ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात आपला हातभार लावला.
जसवीर सिंहच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सने पवन कुमार आणि तुषार पाटील या खेळाडूंवर चढाईची जबाबदारी सोपवली होती. या विश्वासाला सार्थ ठरवत दोघांनाही चांगल्या गुणांची कमाई करत आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी बजावली. त्यांना नितीन रावलनेही ३ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. मात्र जयपूरच्या बचावफळीला आजच्या सामन्यात हवातसा प्रभाव पाडता आला नाही.
सामना बरोबरीत सोडवण्यासाठी अखेरच्या चढाईत जयपूरला बंगालच्या मणिंदरपची पकड करणं गरजेचं होतं. मात्र पकड करण्याच्या नादात जयपूरच्या बचावपटूंनी मणिंदरला बोनस पॉईंट बहाल केला. यामुळे केवळ एका गुणाच्या फरकाने बंगालने सामन्यात विजय मिळवला.