कर्णधार रोहित कुमारने चढाईत केलेला आक्रमक खेळ आणि त्याला इतर खेळाडूंनी दिलेली साथ या जोरावर बंगळुरु बुल्सने उत्तर प्रदेशच्या संघाचा धुव्वा उडवला. या सामन्याच्या निकालाचा प्ले-ऑफच्या प्रवेशावर परिणाम होणार नसला तरीही बंगळुरु बुल्सचा या विजयातून नक्कीच आत्मविश्वास वाढलेला आहे. प्ले-ऑफसाठी दाखल झालेल्या उत्तर प्रदेशच्या संघाने आजच्या सामन्यात आपल्या दुसऱ्या फळीला खेळण्याची संधी दिली होती. मात्र त्यांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
बंगळुरुच्या विजयाचा खरा साक्षीदार ठरला तो कर्णधार रोहित कुमार. रोहितने चढाईने तब्बल ३२ गुणांची कमाई केली. या सामन्यात रोहितने प्रो-कबड्डीच्या इतिहासात एका सामन्यात चढाईत सर्वाधीक गुण मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम काशिलींग अडके आणि रिशांक देवाडीगा या खेळाडूंच्या नावे होता. रोहितच्या आक्रमक खेळाला त्याच्या संघातील इतर खेळाडूंनीही चांगली साथ दिली. ज्याचा उत्तर प्रदेशवर चांगलाच दबाव पडला. बचावफळीतही रविंदर पहल, प्रितम छिल्लर या खेळाडूंनी उत्तर प्रदेशच्या उरल्या सुरल्या आशा संपवून टाकल्या.
उत्तर प्रदेशच्या संघाने आजच्या सामन्यात आपल्या महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली. नितीन तोमर, रिशांक देवाडीगा यांच्या अनुपस्थितीत चढाईची जबाबदारी सुरिंदर सिंह, महेश गौड यांनी सांभाळली. मात्र या दोघांचा अपवाद उत्तर प्रदेशच्या एकाही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. अनुभवी राजेश नरवालच्या गुणांची पाटीही आज कोरीच राहिली. त्यामुळे पहिल्या सत्रापासून पिछाडीवर पडलेला उत्तर प्रदेशचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही.