प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात घरच्या मैदानावर खेळताना अखेर बंगळुरु बु्ल्सच्या संघाला सूर सापडलेला आहे. आज झालेल्या एकमेव सामन्यात बंगळुरु बुल्सच्या संघाने बंगाल वॉरियर्सवर ३१-२५ अशी मात केली होती. बंगळुरु बुल्सकडून आज रेडर्स आणि बचावपटूंनी अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन करत आपली पराभवाची मालिका खंडीत केली.
बंगळुरु बुल्सकडून आजच्या सामन्यात कर्णधार रोहीत कुमार आणि अजय कुमार यांनी रेडींगमध्ये बंगालच्या संघावर दबाव टाकला. अजयने रेडींगमध्ये ८ गुणांची कमाई केली. कर्णधार रोहीत कुमारने सामन्यात ६ गुण मिळवले. रोहीतने रेडींगसोबत बचावातही आपलं भरीव योगदान दिलं. आजच्या सामन्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बंगळुरुच्या संघातील प्रत्येक खेळाडूने विजयासाठी आपला हातभार लावला. याआधीच्या सामन्यांमध्ये कर्णधार रोहीत कुमारवर संघाचा भार येत होता, मात्र आज बंगळुरुने परिपूर्ण खेळाचं प्रदर्शन घडवलं. बंगळुरुकडून बचावपटू रविंदर पेहेल, महेंदर सिंह आणि आशिष कुमारने चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडवलं. बंगालच्या संघातल्या महत्वाच्या रेडर्सवर अंकुश ठेवण्यात बंगळुरुचे बचावपटू यशस्वी ठरले.
बंगाल वॉरियर्सला आज कमकुवत रेडींगने दगा दिला. कोरियन खेळाडू जँग कून लीचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूने पॉईंट मिळवले नाही. लीने आजच्या सामन्यात बंगालकडून एकाकी झुंज देत ८ पॉईंटची कमाई केली. त्याला मणिंदर सिंह आणि विनोद कुमारकडून हवी तशी साथ मिळू न शकल्यामुळे बंगालच्या संघावर दबाव वाढत गेला. मणिंदर आणि विनोद कुमार यांनी मिळून संपूर्ण सामन्यात केवळ ४ पॉईंट मिळवले. सामन्यातला बहुतांश वेळ या दोन्ही रेडर्सना संघाबाहेर बसवण्यात बंगळुरुचे बचावपटू यशस्वी ठरले होते.
बंगालच्या बचावफळीने मात्र या सामन्यातही आपली कामगिरी चोख बजावली. कर्णधार सुरजित सिंह, डावा कोपरारक्षक रण सिंह या दोघांनी मिळून सामन्यात ८ गुणांची कमाई केली. त्याला श्रीकांत तेवतियानेही १ गुण मिळवत चांगली साथ दिली. मात्र रेडर्सच्या अपयशी खेळामूळे त्यांनी केलेल्या कामगिरीवर पाणी फिरलं.
या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही, आपल्या पराभवाचं अंतर ७ पेक्षा कमी गुणांनी केल्यामुळे बंगालला आजच्या सामन्यातून १ गुण मिळणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यात हे दोन्ही संघ कसे कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.