प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पदार्पण करणाऱ्या गुजरात फॉर्च्युनजाएंटने दबंग दिल्लीच्या संघावर मात केली आहे. आपला पहिला सामना खेळणाऱ्या गुजरातच्या संघाने सुरुवातीपासून दिल्लीच्या संघावर दडपण ठेवलं होतं. कर्णधार सुकेश हेगडे आणि अन्य रेडर्सनी आपल्या झंजावाती रेडपुढे दिल्लीचा बचाव खिळखिळा करुन टाकला. त्यामुळे सुरुवातीची काही मिनीटं हा सामना एकदम अटीतटीचा सुरु होता. मात्र काही वेळाने गुजरातच्या खेळाडूंनी दिल्लीच्या संघातले कच्चे दुवे हेरत, त्यावर प्रहार करायला सुरुवात केली. गुजरातच्या संघाने अचानक पकडलेला जोर पाहून दिल्लीचा संघही सामन्यात बावचळलेला दिसून आला.
पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मिराज शेख आणि अबुफजल मग्शदूलू यांना आजच्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्लीचे इराणी रेडर विरुद्ध गुजरातचे इराणी बचापटू अशा झालेल्या सामन्यात गुजरातनेच बाजी मारली. गुजरातचा डावा कोपरारक्षक फजल अत्राचलीने इराणच्या दोन्ही रेडर्सना आपल्या जाळ्यात अडकवलं. पहिल्या सत्राच्या अखेरीस गुजरातने दिल्लीच्या संघावर १५-५ अशी दहा गुणांची आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रात दिल्लीचा संघ सामन्यात पुनरागमन करेलं अशी आशा वर्तवली जात होती, मात्र ती देखील फोल ठरली. दिल्लीचा बचावही आजच्या सामन्यात आपल्या सुरात दिसत नव्हता. बाजीराव होडगे, निलेश शिंदे यांच्याकडून सामन्यात काही अक्षम्य चुका झाल्या. ज्याचा फायदा गुजरातच्या संघाने उचलला. सलग दुसऱ्या सत्रात दिल्लीच्या संघाला सामन्यात ऑलआऊट करण्यात गुजरातच्या संघाला यश आलं. एका क्षणापर्यंत गुजरातने सामन्यात २५-९ अशी आघाडी घेतली होती.
मात्र अखेरच्या काही मिनीटांमध्ये दबंग दिल्लीचे प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांनी संघात काही बदलं गेले. कर्णधार मिराज शेखला बाहेर बसवून आर.श्रीराम या बदली खेळाडूला संघात स्थान देण्यात आलं. याचा थोडासा फायदा अखेरच्या काही मिनीटांमध्ये दबंग दिल्लीच्या संघाला झाला. श्रीरामने आपल्या रेडमध्ये काही महत्वाचे पॉईंट मिळवत गुजरातच्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, ज्याला दिल्लीच्या बचावपटूंनीही चांगली साथ दिली. त्यामुळे अखेरच्या मिनीटांमध्ये दबंग दिल्ली गुजरातच्या संघाला एकदा ऑलआऊट करण्यात यशस्वी ठरली.
सामना जरी दिल्लीच्या हातून निसटला असला तरी यातून दिल्लीच्या संघाने १ पॉईंट मिळवला आहे. ७ पेक्षा कमी गुणांच्या फरकाने हरलेल्या संघाला प्रो-कबड्डीत पराभवानंतरही १ पॉईंट मिळतो. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाला याचा कसा फायदा होतो हे पहावं लागणार आहे.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – घरच्या मैदानावर तेलगू टायटन्सच्या पराभवाची हॅटट्रीक