इस शहरने बहोत प्यार दिया है, सर जी! यहा के लोग झटसे बाहर वाले को अपना लेते है. हिमाचल प्रदेशचा सुरिंदर सिंह मुंबईच्या प्रेमात पडला आहे. प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात यू मुम्बाच्या संघात सुरिंदर सिंहचा समावेश करण्यात आला आहे. लिलावाव्यतिरीक्त यू मुम्बाने यंदा देशातील छोट्या शहरातील खेळाडूंना कबड्डीत मोठी संधी मिळावी यासाठी एका कँपचं आयोजन केलं होतं. त्यात सुरिंदर सिंहचा खेळ पाहून यू मुम्बाच्या संघ व्यवस्थापनाने सुरिंदरचा संघात समावेश करुन घेतला आहे. या निमीत्ताने सुरिंदर सिंहने खास ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी संवाद साधला.
पाचव्या पर्वात यू मुम्बाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पुणेरी पलटणकडून मुम्बाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात सुरिंदर सिंहला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र हरियाणा स्टिलर्सविरुद्ध सुरिंदरचा पहिल्या ७ जणांच्यात समावेश करण्यात आला, आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत बचावात ४ पॉईंट मिळवले. हरियाणा विरुद्धच्या सामन्यातही यू मुम्बाला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. सुरिंदरचा फॉर्म वगळता इतर खेळाडूंना फॉर्मात येण्यासाठी दुसऱ्या सत्राची वाट पहावी लागत होती. मात्र सुरिंदरच्या मते ही फारशी चिंतेची बाब नाहीये. “आमच्या संघात अनुभवी बचावपटूंचा भरणा आहे. जोगिंदर नरवाल, डी. सुरेश कुमार यासारखे तगडे खेळाडू आमच्या संघात आहेत. त्यामुळे त्यांना फॉर्मात येण्यासाठी एक सामना पुरेसा आहे. एकदा या स्पर्धेत त्यांनी सूर पकडला तर मग त्यांना थांबवणं कोणालाही शक्य होणार नाही”, असं सुरिंदरने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितलं.
हरियाणा स्टिलर्सविरुद्धच्या सामन्यात सुरिंदर सिंहने केलेली कामगिरी ही खरच दाद देण्यासारखी होती. अँकल होल्ड, डॅश सारख्या मुलभूत स्किल्सचा वापर करत त्याने हरियाणाच्या रेडर्सना बुचकळ्यात पाडलं होतं. या सामन्यात हरियाणाच्या वझीर सिंहचा सुरिंदर सिंहने केलेला बॅकहोल्ड हा इतक्या ताकदीचा होता की, वझीर सिंहला त्याच्या तावडीतून सुटणं शक्यच झालं नाही. या टॅकलनंतर कर्णधार अनुप कुमारनेही सुरिंदर सिंहला अलिंगन देत दाद दिली.
कर्णधार अनुप कुमार आणि इतर संघ व्यवस्थापनाच्या सहकार्याबद्दलही सुरिंदर भरभरुन बोलला. अनुप कुमार हा आम्हाला आमचा कर्णधार वाटतच नाही. आम्हाला कोणतीही अडचण असली तरीही तो एक गोष्ट ३-३ वेळा सांगतो. अगदीच गरज पडली तर आमच्यासोबत मैदानात उतरुन आम्हाला बचावातले डावपेच शिकवतो. त्यामुळे एक कर्णधार म्हणून अनुपचा आम्हाला खूप आधार असतो. प्रशिक्षक भास्करन आणि रवी शेट्टी यांनीही आमच्यातल्या स्किल्सवर काम करुन आमचा खेळ सुधारण्यावर भर दिला आहे.
सुरिंदर सिंहची देहयष्टी एखाद्या सामन्य खेळाडूप्रमाणे असली, तरीही त्याच्यात ताकद खूप आहे. एखाद्या खेळाडूला तंत्रशुद्ध पद्धतीने होल्ड, डॅश करण्याचं स्किल त्याच्या अंगात आहे. त्यामुळे सुरिंदर सिंहच्या रुपाने यू मुम्बाला आपल्या डिफेन्सच्या डोकेदुखीवर रामबाण उपाय मिळालेला आहे. आज यू मुम्बाचा सामना दबंग दिल्लीसोबत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सुरिंदर सिंहकडून यू मुम्बाला खूप अपेक्षा असणार आहेत.