३ महिन्यांच्या प्रवासानंतर प्रो-कबड्डीचं पाचवं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहचलं आहे. तब्बल १२ संघांमध्ये सुरु असलेल्या रणसंग्रामात अखेर गतविजेता पाटणा पायरेट्स आणि पाचव्या पर्वात पदार्पण केलेल्या गुजरातच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उद्या चेन्नईच्या मैदानावर या दोन्ही संघांमध्ये पाचव्या पर्वाचा अंतिम सामना रंगणार आहे. गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने बंगालच्या संघावर ४२-१७ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर पाटणा पायरेट्सच्या संघानेही बंगाल वॉरियर्सवर मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान नक्की केलं. त्यामुळे या दोन्ही संघांमधला अंतिम हा सामना हा रंगतदार होणार यात काहीच वाद नसल्याचं जाणकारांनी म्हणलं आहे.
पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीआधी दोन्ही संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी प्रो-कबड्डीच्या ट्रॉफीसोबत फोटोसेशन केलं. यावेळी गुजरातचं नेतृत्व करणाऱ्या फैजल अत्राचलीने हे पर्व आपल्यासाठी अनेक कारणांसाठी खास असल्याचं नमूद केलं. नवीन संघ असूनही आम्ही संपूर्ण हंगामात एकत्र होऊन खेळलो ज्याचा फायदा आम्हाला अंतिम फेरीत पोहचताना झाला. त्यामुळे अंतिम सामन्यातही आमची हीच रणनिती असेल असं फैजलने स्पष्ट केलं.
तर दुसरीकडे पाटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालने, तिसऱ्या पर्वातही आपलाच संघ बाजी मारेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. पाचवं पर्व सुरु होताना, आम्ही विजयाची हॅटट्रीक साधायची हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं. या ध्येयासाठी आमच्या संघातला प्रत्येक खेळाडू गेले ३ महिने झटत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात आम्ही कोणतीही कसर ठेवणार नसल्याचं सांगत प्रदीपने हा सामना अजुनच रंगतदार होणार हे सांगितलं. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्व क्रीडारसिकांचं लक्ष लागलेलं असणार आहे.