प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पदार्पण करणाऱ्या गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईत एनएससीआयच्या मैदानावर झालेल्या सामन्यात गुजरातने बंगाल वॉरियर्सचा ४२-१७ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. संपूर्ण सामन्यात गुजरातच्या संघाने एकदाही बंगालला सामन्यात डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. नवोदीत खेळाडूंच्या जोरावर गुजरातच्या संघाने अंतिम फेरीत मारलेली धडक ही नक्कीच वाखणण्याजोगी मानली जात आहे. चढाई आणि बचाव अशा दोन्ही क्षेत्रात गुजरातने अष्टपैलू कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

बंगाल वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यासाठी गुजरातने आपला कर्णधार सुकेश हेगडेला राखीव खेळाडूंमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला. सुकेशच्या जागी इराणचा खेळाडू आणि कोपरारक्षक फैजल अत्राचलीने संघाचं नेतृत्व केलं. गुजरातने आपल्या साखळी सामन्यातला विजयी फॉर्म कायम राखत सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवलं. महाराष्ट्राच्या महेंद्र राजपूतने चढाईची धुरा सांभाळत सामन्यात गुजरातला आघाडी मिळवण्यात मदत केली. मध्यांतरापर्यंत महेंद्रने चढाईत ५ गुणांची कमाई केली, त्याला सचिन तवंर आणि राकेश नरवालने चांगली साथ दिली. गुजरातच्या चढाईपटूंनी मुख्यत्वे बंगालचा बचाव खिळखिळा करण्याचं काम केलं. त्यांना परवेश भैंसवाल आणि फैजल अत्राचलीनेही चांगली साथ दिली.

पहिल्या सत्रात बंगालच्या स्टार खेळाडूंनी निराशा केली. मणिंदर सिंहला चढाईत आणि सुरजित सिंहला बचावात एकही गुण कमावता आला नाही. याजागी दीपक नरवालने ४ गुणांची कमाई करत आपल्या संघाचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतर खेळाडूंची हवीतशी साथ न लाभल्याने पहिल्या सत्राच्या अखेरीस गुजरातने १३-१० अशी ३ गुणांची आघाडी आपल्याकडे कायम राखली.

मध्यांतरानंतर दुसऱ्या सत्रात बंगालच्या संघाला ऑलआऊट करण्यात गुजरातच्या खेळाडूंना यश आलं. ज्याचा फायदा घेत गुजरातने सामन्यात ९ गुणांची आघाडी घेतली. अबुझार, फैजल आणि परवेश तिनही बचावपटूंनी बंगालच्या चढाईपटूंना सामन्यात वरचढ होण्याची संधीच दिली नाही. त्यात दुसऱ्या सत्रात बंगालचा कर्णधार सुरजित सिंहने बचावात क्षुल्लक चुका करण्याचं सत्र सुरुच ठेवलं, ज्यामुळे बंगालच्या खेळाडूंचा सामन्यातला आत्मविश्वास कमी होताना दिसला. यात एकाही बचावपटूने गुजरातच्या चढाईपटूंची पकड करण्याचा प्रयत्न केला नाही, ज्याचा गुजरातच्या खेळाडूंना सामन्यावर आपली पकड मजबूत करायला आणखीनच फायदा झाला.

यानंतर बंगालचा संघ सामन्यात आणखी एक वेळा ऑलआऊट झाला. गुजरातच्या एकाही चढाईपटूच्या खेळीचं उत्तर बंगालच्या बचावाफळीतल्या खेळाडूकडे नव्हतं. दुसऱ्या सत्रात बंगाल वॉरियर्सकडून मणिंदर सिंह आणि भूपिंदर हुडा यांनी गुजरातला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. या विजयासह गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात बंगालच्या पदरी पराभव पडला तरीही अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे.

Story img Loader