प्रो-कबड्डीत दबंग दिल्लीच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. चेन्नईत गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात दबंद दिल्लीला ४२-२२ असा मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला. दिल्ली हा सध्या गुणतालिकेत १४ व्या पराभवासह तळातल्या स्थानावर आहे.
आपल्या आक्रमक खेळाचा धडाका कायम ठेवत गुजरातने सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व कायम ठेवलं. पहिल्या काही मिनीटांमध्येच गुजरातकडे ११ गुणांची आघाडी होती. आजच्या सामन्यात गुजरातच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते चढाईपटू. युवा खेळाडू सचिनने सामन्यात चढाईत ११ गुणांची कमाई करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. त्याला चंद्रन रणजीतने ९ तर राकेश नरवालने ६ गुणांची कमाई करत तोलामोलाची साथ दिली.
गुजरातच्या विजयात महत्वाची गोष्ट म्हणजे, बचावपटूंना आज फारशी चमक दाखवण्याची संधी मिळाली नाही. तरीही सुनील कुमार आणि अबुझार मेघानी यांनी काही गुणांची कमाई केली, मात्र गुजरातच्या विजयात चढाईपटूंनी महत्वाची भूमिका बजावली.
दबंग दिल्लीकडून अबुफजल मग्शदुलू आणि आर. श्रीराम या चढाईपटूंचा अपवाद वगळता सर्व खेळाडूंनी निराशा केली. गुजरातच्या खेळापुढे दिल्लीचा एकही खेळाडू तग धरु शकला नाही. आपल्या खेळाडूंची कामगिरी पाहता प्रशिक्षक रमेश भेंडीगीरी यांनी दुसऱ्या सत्रात प्रत्येक राखीव खेळाडूंना संघात जागा दिली, मात्र त्यांनीही निराशा केली.
दिल्लीकडून अबुफजल आणि श्रीरामने चढाईत अनुक्रमे ७ आणि ६ गुणांची कमाई केली. मात्र कर्णधार मिराज शेख, आनंद पाटील आणि बचावफळीतील इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.